बेळगाव : कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार बेळगावमधील दुकानांच्या नामफलकांवर ६०% जागेत कन्नड मजकुराच्या पाट्या लावण्याच्या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिकेने बेळगावात आज पोलीस संरक्षणात जागृती फेरी काढली. एकीकडे सरकारच्या आदेशानुसार दुकाने-आस्थापनांच्या नामफलकांवर ६०% जागेत कन्नड मजकुराच्या पाट्या लावण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार बेळगाव महापालिका कार्यवाही करत आहे. तरीही काही कन्नड संघटना आगंतूकपणा करून आपणच कन्नडचे कैवारी असल्याच्या थाटात कायदा हाती घेऊन दडपशाही करीत सुटल्या आहेत, हे गेल्या काही महिन्यातील घटनांवरून स्पष्ट होते. अशाच प्रकारे कन्नड रक्षण वेदिकेच्या नारायण गौडा गटातर्फे आज कन्नड फलकांच्या जागृतीच्या नावाखाली फेरी काढून धाकदपटशा करण्यात आला.केपीटीसीएल भवनापासून सुरु होऊन रामदेव सर्कल, केएलई हॉस्पिटल, कोल्हापूर सर्कल, आंबेडकर सर्कल मार्गे ही फेरी चन्नम्मा सर्कलपर्यंत पोहोचली. या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकाने, आस्थापनांना कन्नड बोर्ड लावण्याची सक्ती करण्यात आली. करवेच्या या दादागिरीतून रुग्णांना जीवनदान देणारी हॉस्पिटल्सही सुटली नाहीत. जीवनरेखा व अन्य हॉस्पिटल्सनाही करवे कार्यकर्त्यांनी कन्नड बोर्डांसाठी जाच केला. अखेर चन्नम्मा चौकात फेरी येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनातून नेले.
तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी म्हणाले की, कर्नाटक सरकारने सर्व दुकानदारांना नामफलकांवर ठळकपणे कन्नड वापरण्याचे आदेश यापूर्वीच जारी केले आहेत. बेळगावातील दुकानांच्या नामफलकांवर कन्नड नावाच्या पाट्या लावण्याची विनंती आज कर्नाटक रक्षण वेदिकेने केली आहे. याबाबत आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आवाहन केले आहे. अस्तित्व गमावलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर व्होटबँकेसाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मुद्दाम कन्नड बोर्ड न लावता द्वेष निर्माण करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
सुरेश बोरन्नावर म्हणाले की, सरकारने यापूर्वी कर्नाटकातील दुकानदारांना त्यांच्या नामफलकांवर 60% कन्नड भाषा वापरण्याचे आदेश दिले होते, परंतु आता आम्ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्यांनी तत्काळ कन्नड स्वीकारून कन्नडमध्ये व्यवसाय करावा, अन्यथा भविष्यात तीव्र संघर्ष छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनात कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते, आंदोलनासाठी शंभरहून अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.