निपाणी (वार्ता) : संभाजीराव भिडे-गुरुजी हे ९० वर्षाचे आहेत. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी यांचे विचार आजच्या तरुण पिढीच्या मनामध्ये रुजविण्यासाठी झिझवले आहेत. यातून लाखो युवक त्यांनी घडले आहेत. अशा व्यक्तिमत्त्वावर हल्ला करणे निषेधार्य आहे. त्यामुळे संबंधित हल्लेखोरावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांना दिले.
निवेदनातील माहिती अशी, युवा पिढी नशेच्या विळख्यात अडकण्याची भयंकर स्थिती असतांना लाखो युवकांना देव देश आणि धर्म या शिवरायांच्या प्रेरणेने भारीत करण्याचे काम संभाजीराव भिडे गुरुजींनी केले आहे. अशा ऋषितुल्य व्यक्तींवर मनमाड येथे जो प्राणघातक हल्ला झाला. या भ्याड हल्ल्याचा हिंदुत्ववादी संघटनेतर्फे तीव्र निषेध करीत आहोत. हल्ल्यात सहभागी असणाऱ्या व सूत्रधार असणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. तहसीलदार बळीगार यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
त्यावेळी हिंदू जनजागृती समितीचे जुगलकिशोर वैष्णव, योगेश चौगुले, आप्पासाहेब जत्राटे, श्रीराम सेना कर्नाटकचे अमोल चेंडके, बबन निर्मले, विशाल मोहिते, श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राजेश आवटे, सचिन लोखंडे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.