काँग्रेसची १७ उमेदवारांची यादी जाहीर
बंगळूर : पुढील लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. एकूण १७ मतदारसंघांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर, कारवारमधून माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर तर चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अद्याप चार उमेदवारांची नावे निश्चित झालेली नाहीत.
सौम्या रेड्डी बंगळुर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राजीव गौडा बंगळुर उत्तरमधून निवडणूक लढवणार आहेत. एआयसीसीद्वारे प्रकाशित केलेली ही तिसरी आणि प्रदेश काँग्रेसची दुसरी यादी आहे. एआयसीसीने एकूण ५७ नावांची घोषणा केली आहे. कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या लोकसभा मतदारसंघांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
ईश्वर खांड्रे यांचा मुलगा २६ वर्षीय सागर खांड्रे यांना बीदर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. अशा प्रकारे ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील सर्वात तरुण स्पर्धकांपैकी एक आहेत. म्हैसूर मतदारसंघात काँग्रेसचे एम. लक्ष्मण हे भाजपचे यदुवीर वोडेयार यांच्याविरुद्ध लढणार आहेत.
मतदारसंघ व उमेदवार असे
१. चिक्कोडी : प्रियंका जारकीहोळी
२. बेळगाव : मृणाल हेब्बाळकर
३. उत्तर कन्नड : डॉ. अंजली निंबाळकर
४. बागलकोटे : संयुक्ता पाटील
५. गुलबर्गा : डॉ. राधाकृष्ण दोड्डामणी
६. रायचूर : कुमार नाईक
७. बिदर : सागर खांड्रे
८. कोप्पळ : राजशेखर हिटनाळ
९. धारवाड : विनोद आसूटी
१०. दावणगेरे : प्रभावती मल्लिकार्जुन
११. उडुपी-चिक्कमंगळूर : जयप्रकाश हेगडे
१२. दक्षिण कन्नड : पद्मराज
१३. म्हैसूर-कोडगू : एम. लक्ष्मण
१४. बंगळूर उत्तर : प्रा. राजीव गौडा
१५. बंगळूर मध्य : मन्सूर खान
१६. बंगळूर दक्षिण : सौम्या रेड्डी
१७. चित्रदुर्ग : बी. एन. चंद्रप्पा