बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित होत असतानाच भाजपकडून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती भाजप सूत्रांकडून समजते.
विद्यमान खासदार मंगला आंगडी यांना याबाबत विचारले असता त्यांनी देखील या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. भाजप नेते जगदीश शेट्टर यांचेच नाव निश्चित झाल्याची चर्चा भाजपच्या गोटात चर्चिली जात आहे. मात्र अंतिम यादी जाहीर झाल्यानंतरच या वावड्यांना पूर्णविराम मिळणार.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातून स्थानिक नेत्यालाच प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. शेट्टर हे हुबळीचे असल्याने भाजपाने त्यांची उमेदवारी नाकारली असल्याची चर्चा चर्चिली जात होती. स्थानिक उमेदवारांमध्ये माजी आमदार संजय पाटील, महांतेश कवटगीमठ यांची नावे चर्चेत आहेत. मात्र भाजपच्या उमेदवारांची यादीत बेळगावसाठी भाजपचे उमेदवार शेट्टर असतील अशी चर्चा मात्र भाजप गोटात सुरू आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे बेळगाव बाहेरील असले तरी देखील बेळगाव मतदारसंघातील बडे नेते रमेश जारकीहोळी, खासदार मंगला अंगडी यांच्यासारख्या दिग्गजांचा त्यांना पाठिंबा असल्यामुळे तसेच कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपला कार्यकाळ यशस्वीरीत्या पार पडल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी शेट्टर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यातून उत्साहाचे वातावरण पसरले आहे.