बेळगाव : बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिरच्या पाठीमागे असलेल्या कपिलेश्वर तलाव परिसरातील समस्यांकडे महानगरपालिकेचे तसेच हॅस्कॉमचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
कपिलेश्वर तलावात परिसरातील लहान मुले तसेच तरुण वर्ग नेहमीच पोहण्याचा आनंद लुटत असतात. सध्या उन्हाळी सुट्टी असल्यामुळे बालचमू कपिलेश्वर तलावात पोहण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. मात्र या तलाव परिसरात विद्युतभारीत तारा लोंबकळत आहेत त्याचप्रमाणे तलावाच्या काठावरील माती ढासळत आहे. अशीच माती कोसळत राहिली तर तलावाच्या काठावर असलेला विद्युत खांब तलावात कोसळण्याची भीती स्थानिक नागरिकांतून व्यक्त केली जात आहेत. याबाबत हेस्कॉम तसेच महानगरपालिका प्रशासनाने लक्ष घालून त्या लोंबकळणाऱ्या विद्युतभारीत तारा हटवाव्यात अशी मागणी कपिलेश्वर तलाव परिसरातील नागरिक करीत आहेत.