विमानतळावरच अटकेची शक्यता; ३१ रोजी होणार आगमन
बंगळूर : सेक्स स्कँडलमध्ये गुंतलेले हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे प्रज्वलला आता विमानतळावरच अटक होण्याची शक्यता आहे. त्याने वकीलामार्फत आजच लोकप्रतिनीधी विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
बंगळुर येथील विशेष न्यायालयाने बुधवारी हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, ज्यांना बलात्कारासह अनेक प्रकरणांमध्ये महिलांच्या लैंगिक छळाच्या आरोपाचा सामना करावा लागत आहे. प्रज्वलचे वकील अरुण यांनी दाखल केलेला जामीन अर्ज लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावला.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल ३० मे रोजी म्युनिकहून बंगळुरला परतणार असून प्रज्वलने आधीच त्याचे विमानाचे तिकीट बुक केले असल्याचे सांगितले जात आहे. ३१ मे रोजी ते शहरात दाखल होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आता सर्वांचे लक्ष केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे लागले असून प्रज्वल रेवण्णाला विमानतळावर अटक करण्याची तयारी एसआयटीचे अधिकारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
२७ एप्रिल रोजी कर्नाटकात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान केल्यानंतर प्रज्वल परदेशात गेला. नंतर त्याचाच असल्याचे बोलले जात असलेल्या सेक्स स्कँडलच्या व्हिडिओंनी प्रचंड गदारोळ केला. याच प्रकरणात प्रज्वलचे वडील एच. डी. रेवण्णा यांनाही अटक करण्यात आली होती आणि नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यांची धर्मपत्नी भवानी रेवण्णा हिलाही अपहरण प्रकरणात अटकेची भीती असून तिच्या जामीन अर्जावर ३१ तारखेला सुनावणी होणार आहे.
त्याच दिवशी प्रज्वलही शहरात येण्याची शक्यता आहे. एसआयटीने दाखल केलेल्या याचिकेवर निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने १८ मे रोजी प्रज्वल रेवण्णा विरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. त्यांना धजद पक्षातूनही निलंबित करण्यात आले आहे.
विमानतळावरच अटक करणार
दरम्यान, खासदार प्रज्वल रेवण्णा यांना विमानतळावर आल्यानंतर लगेचच अटक केली जाईल, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी बुधवारी सांगितले.
३१ मे रोजी आपल्याविरुद्धच्या खटल्यांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) हजर होणार असल्याचे व्हिडिओ स्टेटमेंट प्रज्वलने जारी केल्यानंतर दोन दिवसांनी परमेश्वर यांनी हे विधान केले.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी ३० मे रोजी म्युनिक ते बंगळुरला परतीच्या विमानाचे तिकीट बुक केले आहे आणि ते ३१ मे रोजी केम्पेगौडा विमानतळावर उतरण्याची अपेक्षा आहे.
आज शहरात पत्रकारांशी बोलताना परमेश्वर म्हणाले की, प्रज्वलविरुद्ध वॉरंट जारी झाल्यापासून एसआयटी सर्व आवश्यक पावले उचलण्याची वाट पाहत आहे. त्याला अटक करून त्याचे बयाण (एसआयटी) घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.
प्रज्वल रेवण्णाला विमानतळावर उतरताच अटक केली जाईल का, असे विचारले असता ते म्हणाले, “त्याला विमानतळावरच अटक करावी लागेल. कारण त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे त्याला अटक करावी लागेल.”