बेळगाव : अवघ्या एक महिन्याच्या अर्भकाला विकण्याचा प्रयत्न मार्केट पोलिसांनी हाणून पाडला. यामध्ये डॉक्टर, कंपाऊंडरसह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, प्रेमसंबंधातून जन्मलेले परंतु प्रेमीयुगुलाला नको असलेले मूल डॉक्टर आणि कंपाऊंडर यांनी संगनमताने एका नर्सला अवघ्या 60 हजार रुपयांना विकले आणि ती रक्कम डॉक्टर आणि कंपाऊंडर यांनी निम्मी निम्मी वाटून घेतली. बाळ अधिक किमतीत विकण्यासाठी महादेवी बेळगावात आली. याची माहिती माळमारुती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची यांनी पोलीस आयुक्त याडा मार्टिन, डीसीपी रोहन जगदीश, डीसीपी पी.व्ही.स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून बाळ विक्रीसाठी आणलेल्या महादेवी हीला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला व या प्रकरणातील 5 जणांना अटक करण्यात आले. अटक केलेल्या संशयितांमध्ये महादेवी उर्फ प्रियांका बाहुबली जैनर (रा.नेगिनहाळ, ता.बैलहोंगल), डॉ.अब्दूलगफार हुसेनसाब लाड खान (रा.हंचीनाळ, ता.सौन्दत्ती सध्या रा.सोमवारपेठ कित्तुर), चंदन गिरीमल्लाप्पा सुभेदार (रा.तुरकर शिगेहल्ली, ता.बैलहोंगल) पवित्रा सोमाप्पा मडिवाळकर रा. संपगाव ता. बैलहोंगल) व प्रवीण मंजुनाथ मडिवाळकर (रा. होसट्टी ता. जि. धारवाड) यांचा समावेश आहे.