बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉक्टर अशोक साठे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे बेळगाव सीमाभागातील प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळेतील मुलांच्या मराठी भाषा समृद्धीसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जाते ज्यामध्ये मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा मराठी हस्ताक्षर स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे इयत्ता सातवी व इयत्ता दहावी अशा दोन वर्गांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा तर इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी या गटासाठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी बेळगाव परिसरातील मराठी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुलांनी या सामान्य ज्ञान स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांनी कळविले आहे.
मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व मराठी हस्ताक्षर परीक्षा या ऑगस्ट महिन्यात घेतल्या जातील त्याची तारीख नंतर कळविली जाईल. या बैठकीला उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सदस्य मालोजी अष्टेकर, सुरेश गडकरी, विजय बोंगाळे, बी. बी. शिंदे, नीलू आपटे, हर्षदा सुनठणकर, प्राध्यापक सुरेश पाटील, इंद्रजीत मोरे, धीरज सिंह राजपूत, गौरी ओऊळकर, नारायण उडकेकर व गजानन सावंत उपस्थित होते.