बेळगाव : सततच्या पावसामुळे जिल्ह्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व विभागांतील अधिकाऱ्यांशी समन्वयाने काम करावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. अतिवृष्टी आणि पूरस्थिती हाताळण्यासंदर्भात शुक्रवारी (ता. २६) जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
मुसळधार पावसामुळे उद्भवणाऱ्या पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी तहसीलदारांनी आमदारांच्या संपर्कात राहावे. याशिवाय तहसीलदारांनी संबंधित आमदारासोबत बैठक घ्यावी. महानगरपालिका आणि तालुका केंद्रांवर हेल्पलाईन केंद्रे सुरू करावीत. ही केंद्रे चोवीस तास कार्यरत राहावीत. जनतेकडून येणाऱ्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद द्यावी. काळजी केंद्रांमध्ये आश्रय घेणाऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. काळजी केंद्रांमध्ये राहणाऱ्यांना दर्जेदार अन्न व नाष्टा पुरविण्यात यावा. याशिवाय, संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सामुग्रींची कमतरता भासणार नाही, याची काळजी घ्यावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांचे सर्वेक्षण चोखपणे करावे. कोणावरही अन्याय होणार नाही याची दखल घ्यावी. जिल्ह्यातील धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या आवकेवर सातत्याने लक्ष ठेवावे. १ जूनपासून आतापर्यंत ५ जण मृत्यूमुखी पडले असून सरकारच्या मार्गसूचीनुसार मयतांच्या वारसदारांना भरपाई वाटप करण्यासाठी पाऊले उचलण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पोलिस आयुक्त याडा मार्टिन, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आदी बैठकीला उपस्थित होते.