बेळगाव : “आजचा विद्यार्थी हा तंत्रस्नेही असल्याने त्याला एका क्लिकवर जगातील कुठलेही ज्ञान मिळवता येते. त्यामुळे शिक्षक वर्गाने तंत्रस्नेही होणे ही काळाची गरज आहे” असे विचार निवृत्त शिक्षक श्री. बी. बी. शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले. येथील जायंट्स भवनात जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनच्या वतीने शिक्षक दिनी सात शिक्षकांचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बी. बी. शिंदे हे उपस्थित होते.
याप्रसंगी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे डॉ. बी. एस. नावी व प्रा. मंजुनाथ एन के, द .म. शि.म चे शिक्षक जोतिबा शिवाजी पाटील, कणकुंबीच्या प्राथमिक शाळा शिक्षिका सुधा शामराव गायकवाड, किणयेचे शिक्षक परशुराम बसवंत खनूकर, येळ्ळूर मराठी मॉडेल स्कूलच्या शिक्षिका शोभा राजाराम निलजकर व संध्या चोपडे या 7 जणांना श्री. बी. बी. शिंदे व जायंट्स सखीच्या अध्यक्षा अपर्णा अविनाश पाटील यांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. समारंभाचे अध्यक्षस्थानी अध्यक्ष अविनाश पाटील हे होते.
सत्कार मूर्तींच्या वतीने डॉ. नावी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “शिक्षक दिनी जायंट्सने शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करून शिक्षकांना नवी ऊर्जा दिली आहे, त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक हलगेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय भरत गावडे यांनी तर आभार प्रदर्शन ऍड. लक्ष्मण शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन विश्वास पवार यांनी केले. कार्यक्रमास जायंट सदस्य, तसेच सत्कारमूर्तींचे नातेवाईक उपस्थित होते.