Friday , October 18 2024
Breaking News

राज्याच्या बहूतेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Spread the love

 

१२ जिल्ह्यांत यलो अलर्ट; पुढील चार दिवस पावसाचा अंदाज

बंगळूर : राज्यात अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केली असून राजधानी बंगळुरसह राज्यभरात काल झालेल्या पावसाने जनता हैराण झाली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दावणगेरे येथे घर कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झाला.
झाडे व विजेचे खांब जमिनीवर पडले असून, रस्त्यावरही पाणी साचल्याने वाहनांच्या वाहतुकीस अडचण निर्माण झाली आहे. काही ठिकाणी घरांच्या कंपाऊंड भिंती कोसळल्या असून नागरिकांचे हाल झाले आहेत. मैदानी आणि डोंगराळ भागातही पाऊस पडत आहे, पुढील चार दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, राज्यातील १२ जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दावणगेरे येथील चेन्नागिरी तालुक्यातील सांते बेन्नूर येथे घर कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झाला. कुलगट्टे बसवराजप्पा (८१) असे मृताचे नाव आहे, असे सांगितले जाते की, पावसामुळे घर एका बाजूला झुकल्याचे लक्षात आल्याने बसवराजप्पा आणि त्यांचा मुलगा आणि सून घराबाहेर पडले. मात्र त्याचवेळी घराची भिंत कोसळून बसवराजप्पा मातीच्या ढीगाऱ्याखाली सापडला, आणि त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राजधानी बंगळुरमध्ये झालेल्या पावसामुळे सखल भागातील लोक अडचणीत आले आहेत. त्यांना साठलेल्या पाण्याचा सामना करावा लागला आहे आणि काही भागात पाणी साचल्यामुळे लोकांनी रात्र जागून काढली. घरात घुसलेले पाणी काढण्याचे काम करण्यात येत आहे. पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
बंगळुरमध्ये काल रात्री सरासरी १६ मिमी पाऊस झाला आणि पावसाने लोक हादरले. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे व विद्युत खांब जमिनीवर कोसळले आहेत. सखल भागातील घरांचे पाण्यामुळे नुकसान झाले.
बंगळुर बिन्नीपेट, यलहंका, बसवेश्वर नगर, पुट्टेनहळ्ळी, टी. दसराहळ्ळी आणि सर्जापूर मुख्य रस्त्यासह अनेक ठिकाणी पावसामुळे नागरिकांची अडचण झाली, बिन्नीपेटमध्ये अपार्टमेंट कंपाऊंडची भिंत कोसळली, विजेचे खांबही कोसळले.
त्यामुळे रहिवासी घराबाहेर पडण्याच्या स्थितीत नाहीत. सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, कंपाऊंडचा भाग कोसळल्याने अनेक दुचाकी व कार गाड्यांचे नुकसान झाले आहे. बसवेश्वर शहरात पावसामुळे वृद्धाश्रमात पाणी शिरल्याने वृद्धाश्रमातील वृद्धांचे हाल झाले. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरल्याने लोक बेघर झाले.
राजधानी बंगळुरमध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे ४९ भाग प्रभावित झाले आहेत. तीनपेक्षा जास्त प्रदेशांमध्ये १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. बसवेश्वर शहरात १०९.५० मिमी, नागपुरात १०४ मिमी आणि हंपीनगरमध्ये १०२ मिमी पाऊस झाल्याने प्रचंड खळबळ उडाली.
अनेक ठिकाणी आपत्ती
मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरातील बिन्नीपेट येथे एक कंपाऊंड कोसळले आणि दहा गाड्यांचे नुकसान झाले. ४५ घरे कोसळली. दुसरीकडे के. आर. मार्केटकडे जाणारा रस्ता जलमय झाला. पावसाचे पाणी गुडघ्यापर्यंत वाहत असल्याने वाहनधारकांचे हाल झाले. सांकी रस्त्यावर पाणी भरून वाहत असल्याने नागरिकांची मोठी कुचंबणा झाली.
ट्रॅफिक जामची समस्या
एकीकडे पाऊस. दुसरीकडे वाहतूक कोंडीची समस्या एकाच वेळी निर्माण झाली. पावसामुळे बेळ्ळारी रस्ता ठप्प झाला होता. किलोमीटर अंतरावरील वाहतूक कोंडी वाहनधारकांना असह्य झाली होती. दरम्यान, मुसळधार पावसामुळे टाऊन हॉल, कॉर्पोरेशन सर्कल, मॅजेस्टिक या परिसरातील रस्त्यांची अवस्था तलावासारखी झाली होती.
पुढील चार दिवस पावसाचा अंदाज
बंगळुरू शहर, ग्रामीण, कोडगू, म्हैसूर, चामराजनगर, मंड्या, हसन, तुमकूर, रामनगर, चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. १० ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. येत्या चार ते पाच दिवसांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बंगळुरू शहरात ११३ मिमी, बंगळुर ग्रामीण जिल्ह्यात ७४ मिमी, मीरामनगरमध्ये ११० मिमी, मंड्यामध्ये ८७ मिमी, कोलारमध्ये ८४ मिमी, उडुपीमध्ये ६९ मिमी, धारवाडमध्ये ६७ मिमी, दक्षिण कन्नडमध्ये ६६ मिमी, चामराजनगरमध्ये ६६ मिमी पाऊस झाला आहे. .
अन्य ठिकाणी तुमकूरमध्ये ६५ मिमी, गदगमध्ये ६३ मिमी, हसनमध्ये ६४ मिमी, कोडगूमध्ये ७७ मिमी, बेळगावमध्ये ५९ मिमी, हावेरीमध्ये ५२ मिमी, उत्तर कन्नडमध्ये ४७ मिमी, म्हैसूरमध्ये ४४ मिमी, विजयनगरमध्ये ४३ मिमी चिक्कमंगळूरमध्ये ३० मिमी, बिदरमध्ये २४ मिमी, कोप्पळमध्ये २० मिमी, विजयपूरमध्ये २० मिमी आणि विजयनगरमध्ये २० मिमी पाऊस झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पाच एकर जमीन कर्नाटक सरकारला परत करण्याचा मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा निर्णय!

Spread the love  बेंगळुरू : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबीयांच्या सिद्धार्थ विहार ट्रस्टला देण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *