महिलेच्या मोबाईलमध्ये ८ जणांचा खासगी व्हिडिओ कैद
बंगळूर : माजी काँग्रेस मंत्री मलिकय्या गुत्तेदार यांना व्हिडिओ कॉल व त्याचे रेकॉर्डींग करून पैशांसाठी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी नलपाड ब्रिगेडच्या गुलबर्गा शाखेच्या अध्यक्षा आणि त्यांच्या पतीला सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे.
हा ऑडिओ-व्हिडीओ उघड न करण्यासाठी २० लाखांची मागणी करणाऱ्या मंजुळा पाटील आणि त्यांचे पती शिवराज पाटील यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी आजी-माजी मंत्र्यांनाच नव्हे तर प्रतिष्ठितांनाही अडचणीत आनल्याची माहिती मंजुळा पाटील यांच्या मोबाईलवरून मिळाली.
मंजुळा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय असून त्या जिल्हा महम्मद नलपाड ब्रिगेडच्या अध्यक्षा होत्या. त्यामुळे तिची मलिकय्याशी ओळख झाली. दोघेही दिवसा मोबाईलवर बोलत असत. दरम्यान, व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करणाऱ्या मंजुळाने ते ऑडिओ-व्हिडीओ सादर करून पैशांसाठी ब्लॅकमेल केले.
करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी हे जोडपे बंगळुरला आले होते आणि त्यांनी मलिकय्याचा मुलगा रितेशची भेट घेतली. याप्रकरणी रितेशच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अटक करण्यात आलेल्या मंजुळा पाटील यांच्या बॅगेत सहा स्मार्ट फोन सापडले. सीसीबी पोलिसांनी हे सहा फोन जप्त करून तपासले असता आठ जणांचे खासगी व्हिडिओ सापडले. माजी जिल्हा पंचायत सदस्य, एक पोलीस अधिकारी, पीडब्ल्यूडी अधिकारी अशा आठ जणांचे मोबाईल फोनवर व्हिडीओ सापडले असून सीसीबी पोलीस एकामागून एक तपास करत आहेत.