निपाणी : १ नोव्हेंबरला निपाणीसह सीमाभागात काळा दिन पाळण्याची परंपरा आहे. निपाणी तालुक्यात मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. यामुळे काळ्या दिनी एक दिवस मराठी भाषिकांनी एकजूट दाखविण्याचे आवाहन निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केले आहे. त्यासाठी निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची कुर्ली (ता. निपाणी) येथे अजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषिकांची बैठक झाली.
हिंदुराव मोरे यांनी प्रास्ताविक करून माय मराठीसाठी काळा दिन मी पाळणारच, तुम्हीही पाळा असा वज्र निर्धार करण्याचे आवाहन केले.
अजित पाटील म्हणाले, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनानुसार शुक्रवारी (ता. १) मराठी भाषिकांनी घरावर आकाश दिवे न लावता काळ्या दिनात सहभागी व्हावे. तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींसह विविध संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, मराठी भाषाप्रेमींनी नैतिक जबाबदारी म्हणून काळ्या दिनात सहभागी व्हावे.
बंडा पाटील म्हणाले, चुकीच्या पध्दतीने झालेल्या भाषावार प्रांतरचनेमुळे अजूनही सीमाप्रश्न सुटलेला नाही. हा लढा लोकशाही मार्गाने सुरू आहे. १ नोव्हेंबर काळ्या दिनी राज्य सरकारचा निषेध केला जातो. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांसह मराठी साहित्यिक, विचारवंत, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संघटनांनी अन्यायाचे दर्शन घडविण्याची गरज आहे. संतोष निढोरे यांनी सीमाप्रश्नी लढ्यात नव्या पिढीने सहभागाचे आवाहन केले.
आनंदा रणदिवे यांनी तालुक्यातील मराठी भाषिकानी पक्ष भेद, गट-तट विसरून काळ्या दिनात सहभागी होऊन दडपशीहाला उत्तर देण्याचे आवाहन केले. बैठकीस अमोल शेळके, गणेश माळी, संतोष निढोरे, सौरभ केसरकर, शिवाजी पाटील, किरण मगदूम यांच्यासह निपाणी, कोगनोळी, मत्तीवडे, कुर्ली, आप्पाचीवाडी, सौंदलगा, यरनाळ आदी गावांतील कार्यकर्ते उपस्थित होते. नेताजी पाटील यांनी आभार मानले.