बेळगाव : आर्ट्स सर्कलचा दिवाळी पहाट कार्यक्रम मंगळवार दि. २९ ऑक्टोबर रोजी रामनाथ मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. गायिका होत्या विदुषी अपूर्वा गोखले. पहाटे ठीक ६ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम खूप रंगला आणि श्रोत्यांची उत्स्फूर्त अशी दाद कलाकारांना मिळाली. सुरुवातीला मेधा मराठे ह्यांनी सर्वांचे स्वागत केले.
अपूर्वा गोखले ह्यांच्या कार्यक्रमात रसिकांना प्रातःकालीन राग ऐकण्याची सुसंधी मिळाली. त्यांनी भटियार ह्या रागाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यात सुरुवातीला त्यांनी विलंबित तिलवाडा ह्या तालामध्ये बरलीन जाये हा ख्याल आणि
द्रुत त्रितालात तनिक सुनरी सतवचन अब ही बंदिश सादर केली. त्यानंतर राग रामकलीतील विलंबित झूमर्यातील आज राधे तोरे हा ख्याल आणि द्रुत त्रितालातील हूँ तो बार बार ही बंदिश त्यांनी सादर केली.
मध्यंतरात कै. शुभा भागवत ह्यांची कन्या सई भागवत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि श्रोत्यांचे व सर्कलचे आभार मानले.
कलाकारांचा परिचय मेधा मराठे ह्यांनी करून दिला आणि सर्कलच्या पुढील कार्यक्रमांची रूपरेषा त्यांनी सांगितली.
लता कित्तूर ह्यांनी सर्वांचे आभार मानले. मध्यंतरात शरीराची
श्रोत्यांनी फराळाचा आस्वाद घेतला.
मध्यंतरानंतर राग जौनपुरीतील विलंबित तिलवाडामधील अब रंग घोलिया ह्या ख्यालाने मैफिलीची पुन्हां सुरुवात झाली. त्यानंतर राग अंबिका सारंगातील द्रुत त्रितालातील बंदिश आणि एक अभंग गाऊन त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
अपूर्वा गोखले ह्यांना तबल्यावर अंगद देसाई आणि रवींद्र माने ह्यांनी उत्कृष्ट अशी साथ दिली. तानपुर्यावर अपूर्वा गोखले ह्यांच्या शिष्या अमृता शेनॉय आणि निधी केळकर ह्यांनी साथ दिली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.