कडोली : मुलांच्या सवयी त्यांच्या बऱ्या वाईट जडणघडणीला कारणीभूत ठरतात. मुलांना हट्टी व्हायला देऊ नका, त्यांच्या अधिक अपेक्षा वाढवू नका तर त्यांना योग्य वळण लावा, असे आवाहन मराठी विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षण संयोजिका नीलूताई आपटे यांनी केले.
येथील मराठी साहित्य संघ व राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे रविवारी (ता. 10) सायंकाळी झालेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. “मुलांची जडण घडण” असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे अध्यक्ष भरमाणी डोंगरे होते. व्यासपीठावर कस्तुरबा महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिमा पाटील व उपाध्यक्षा सौ. मंगल भोसले उपस्थित होत्या.
आज अनेक पालक गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचा उल्लेख आपटे यांनी केला. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत मुलांवर योग्य संस्कार व्हायचे. नैसर्गिक वातावरणात मुलांची जडण घडण व्हायची. आज जीवन पद्धती बदलल्याने आव्हानात्मक परिस्थिती आहे. अशा स्थितीत मुलांवर योग्य संस्कार होण्याची गरज त्यांनी मांडली. भाषिक बुद्धिमत्ता, तार्कीक बुद्धिमत्ता, निसर्ग विषयक बुद्धिमत्ता, शरीर विषयक बुद्धिमत्ता, संवाद साधण्याची बुद्धिमत्ता अशा साऱ्या बुद्धिमत्ताना योग्य खत, पाणी घातले तर मुलांची जडण घडण चांगली होईल, असा विश्वास नीलूताई यांनी व्यक्त केला.
मोबाईलमुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मोबाईलचे दुष्परिणाम वाढले आहेत. पारंपारिक खेळ कमी झाले आहेत, आनंदाचे प्रकार बदलले आहेत याचा उल्लेख करून मुलांशी सतत संवाद साधत राहा, असे आवाहनही आपटे यांनी केले.
पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व सरस्वती प्रतिमेचे पूजन झाले. तसेच दीप प्रज्वलन झाले. रोहिणी होनगेकर यांच्या स्वागतगीतानंतर डॉ. प्रतिमा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. धनश्री होनगेकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. श्री कलमेश्वर वाचनालयात झालेल्या या कार्यक्रमाला कस्तुरबा महिला मंडळाच्या महिला व पालक उपस्थित होते.