बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे शाळेचे क्रीडा शिक्षक दत्ता पाटील यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे दत्ता पाटील यांनी बालदिन भारतात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, हा दिवस मुलांचे हक्क, त्यांचे महत्त्व आणि त्यांच्याप्रती समाजाच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देण्यासाठी विशेष दिवस आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी बालदिन साजरा केला जातो, असे मनोगतात व्यक्त केले. याचवेळी दुकान जत्रेचे उद्घाटन लता पावशे यांच्या हस्ते करण्यात आले. यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पंडित जवाहरलाल नेहरू व आपली स्वतःची प्रत्यक्ष झालेली भेट कथन केली.इयत्ता तिसरी ‘क ‘चे विद्यार्थी वर्गशिक्षक धीरजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले. विद्यार्थिनी स्वानंदी ताटे हिने पंडित नेहरू यांच्याबद्दल माहिती दिली. पंडित नेहरू यांच्या वेशभूषेत विद्यार्थी ओम अष्टेकर हा उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी पंडित नेहरूंबद्दल संगीत शिक्षक सहदेव कांबळे यांच्या साथीने गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रके तयार केली. सूत्रसंचालन विद्यार्थी अभिजीत मोरे याने केले. आभार प्रदर्शन विद्यार्थिनी शांती गवस हिने केले.
बाल दिनानिमित्त दुकानजत्रेचे आयोजन
यावेळी दुकान जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वेगवेगळे खाऊचे स्टॉल्स मांडले होते. स्वीट कॉर्न, चुरमुरे भेळ, कडधान्य भेळ,कोकम, सरबत, मेहंदी व टॅटू, फनी गेम्स, पुस्तक विक्री, खादी विक्री, पास्ता,पॉपकॉर्न यासारख्या पदार्थांची विद्यार्थ्यांनी चव चाखली. विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाची माहिती मिळावी, खरेदी विक्री यांचे ज्ञान, वेगवेगळ्या पदार्थांची एकाच ठिकाणी चव चाखणे, आनंद मिळवणे, मजा व धमाल हेच याचे उद्दिष्ट होते. विद्यार्थ्यांनी पुरेपूर आनंद घेतला.
यावेळी या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख शैला पाटील व स्नेहल पोटे, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.