सदलगा : येथील प्राचिन विठ्ठल रखुमाई मंदिरातील कार्तिकी उत्सवाची सांगता प्रती वर्षाप्रमाणे आज गौपाळकाला आणि महाप्रसादाने झाली.
आजच्या उत्सवाच्या सांगतेच्या दिवशी मंदिरात मनोहर जोशी यांनी श्री विठ्ठल रखुमाईची महापूजा करण्यात आली होती. श्री विठ्ठल रखुमाईच्या लोभस मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आणि महाप्रसादातील विशेषतः भोपळ्याची भाजी आणि गव्हाच्या खीरीच्या प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी सदलग्याच्या माहेरवाशिणी सहकुटुंब येत असतात. याचबरोबर मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगांव, इचलकरंजी, सांगली, मिरज आदी ठिकाणी वास्तव्यास असलेले सदलगावासीय या दिवशी आवर्जून येत असतात. श्रीपादुका, आरती, गोपाळकृष्ण आणि सूर्य चंद्रांकीत आब्दागिरी मृदंग टाळ च्या गजरात दिंडीची नगरप्रदक्षिणा करत दूधगंगा नदीकडे नेण्यात आली. तिथे आब्दागिरी धुवून आरती म्हटली जाते. तिथे दहिकाल्याचे वाटप करण्यात आले. पुनः दिंडी मंदिराकडे आल्यानंतर नैवेद्य आरती झाली. यानंतर तब्बल संध्याकाळी ६ वाजता महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेऊन खडीसाखरेचा प्रसाद आपापल्या घरी नेला. पुढच्या वर्षीच्या या उत्सवाच्या पुन्हा येण्याचे ठरवूनच निरोप घेतला.