बेळगाव : येथील जीएसएस महाविद्यालयाला नुकताच स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे. व्यवस्थापन, कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी ही गौरवाची बाब आहे. याबाबतची माहिती माजी विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने 28 डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या मैदानावर “सक्सेरियंस २४ रीकनेक्ट अँड रिजोईस” हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्राचार्य अरविंद हलगेकर यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना हलगेकर म्हणाले, महाविद्यालयाला मिळालेला स्वायत्त दर्जा हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. या आनंदात सहभागी होण्याबरोबरच जुन्या मित्र मैत्रिणींना महाविद्यालयाच्या आवारात पुन्हा एकदा भेटता यावे, यासाठी पुनर्मिलन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महामेळाव्यात महाविद्यालयाच्या पहिल्या बॅच पासून यंदाच्या बॅचपर्यंतचे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेने महामेळावा समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून पुनर्मिलन महामेळाव्याचे नियोजन केले जात आहे. विविध माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. एखाद्या महाविद्यालयाने सर्व माजी विद्यार्थ्यांना एकाच वेळी एकत्र आणण्याची ही पहिलीच वेळ असावी असेही हलगेकर यांनी सांगितले.
माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. भरत तोपिनकट्टी म्हणाले, 28 डिसेंबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत पुनर्मिलन महामेळावा होणार आहे. या मेळाव्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा ते अकरा या वेळेत नोंदणी होईल. सकाळी 11 ते 12 या वेळेत उद्घाटन सोहळा होईल. यावेळी माजी प्राचार्य व प्राध्यापकांचा सन्मान केला जाणार आहे. दुपारी बारा ते 2:30 पर्यंत प्रत्येक बॅचमधील विद्यार्थ्यांना स्वतंत्र व्यवस्था करून त्यांच्यामध्ये सुसंवाद घडविला जाणार आहे. यामधून माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. स्नेहभोजनानंतर समूह छायाचित्र आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. माजी विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना यामधून वाव मिळणार आहे असे तो तोपिनकट्टी यांनी स्पष्ट केले.
महामेळावा समितीचे प्रमुख कुलदीप हंगिरगेकर म्हणाले, या स्नेह मेळाव्यातून सर्व माजी विद्यार्थ्यांना एकाच वेळी एकत्र येण्याची संधी मिळाली आहे.हा सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विविध समित्या स्थापून जबाबदाऱ्यांचे वाटप केले जात आहे. महामेळाव्याला 2000 विद्यार्थी सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत 500 माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे असेही हंगिरगेकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रभारी प्राचार्य अभय सामंत, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. संदीप देशपांडे, महामेळावा समितीचे सचिव प्रा. अनिल खांडेकर, ऍड. समीना बेग यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.