सरकारी अधिकाऱ्यांकडून आंदोलनाला परवानगी
बेळगाव : येत्या ९ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशन काळात कर्नाटक राज्यातील मराठा संघटनांच्यावतीने ‘३ बी’ ऐवजी ‘२ बी’ आरक्षण मिळावे , या मागणीकरिता दि. ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला परवानगी द्यावी, यासाठी गुरुवार दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालय येथे पोलीस आयुक्त ईडा मार्टिन, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, बेळगाव जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त कट्टीमनी यांना अर्ज करण्यात आला होता. या आंदोलनाला सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी मिळाली आहे.
यावेळी मराठा नेते विनय कदम यांनी कर्नाटकातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या कुमकुवत असलेल्या मराठ्यांना आरक्षण द्यावे याकरिता शंकराप्पा बॅकवर्ड कमिटी अहवालानुसार कर्नाटक सरकारला शिफारस केलेली आहे. तरी आजपर्यंत कर्नाटकातील कोणतेही सरकार यावर अंमलबजावणी करण्यास तयार नाही. यासाठी येत्या दि. ११ डिसेंबर रोजी बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशना दरम्यान समस्त कर्नाटकातील मराठा संघटनांच्यावतीने धरणे आंदोलन करून सरकारला निवेदन देण्यात येणार आहे. तरी या आंदोलनाला सरकारने परवानगी द्यावी असे आवाहन केले. यावर सरकारी अधिकाऱ्यांनी म्हणणे ऐकून घेत आंदोलनाला परवानगी दिली.
याप्रसंगी मराठा समाज संयोजक विनय विलास कदम, कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन बेळगाव जिल्हाध्यक्ष वैभव कदम, जिल्हा उपाध्यक्ष महेश रेडेकर, बेळगाव जिल्हा महासचिव राहुल भातकांडे, मराठा संघटन बेळगाव अध्यक्ष संजय पाटील, श्री वारकरी सेवा प्रतिष्ठान बेळगाव अध्यक्ष, परशराम राजाराम तुप्पट व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलन स्थळ : १ए टेन्ट सुवर्ण विधानसौध जवळ ; वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत