बेळगाव : सोमवार पासून सुरु होणाऱ्या बेळगाव येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सुमारे 6500 पोलिसांची कुमक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. येथील 580 सीसीटीव्ही कॅमेरे तर दहा ड्रोन कॅमेराद्वारे अधिवेशनावर करडी नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बेळगावात 9 ते 19 डिसेंबर या कालावधीत विधिमंडळ हिवाळी अधिवेशन चालणार आहे. अधिवेशन काळातील पोलीस बंदोबस्त संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस आयुक्त मार्टिन म्हणाले, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर व्यापक पोलिसांचा बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अधिवेशन काळात 6 जिल्हा पोलीस प्रमुख, 38 अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख, 230 पोलीस निरीक्षक तसेच 4 हजार सहाय्यक व राखीव पोलिसांच्या 35 तुकड्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. अधिवेशन काळातील बंदोबस्तासाठी बेंगलोर येथून विशेष गरुडा पथकही तैनात करण्यात आले आहे. विशेष दक्षता घेत पोलिसांना बॉडी कॅमेरेही देण्यात आले आहेत.
सुवर्णसौध, सुवर्णसौध परिसर, शहरातील प्रमुख मार्ग आणि चौकांमध्ये पोलिसांची कुमक वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिवेशनानिमित्त पोलिसांकडून तात्पुरते आऊट पोस्टची निर्मिती सुवर्णसौध परिसरात राहणार आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या निवास भोजनासाठी पोलीस टाऊनशीप उभारण्यात आले आहे. यामध्ये 500 पोलीस कर्मचाऱ्यांच्या भोजन व निवासाची सोय करण्यात आली आहे या ठिकाणी पोलिसांसाठी चांगल्या प्रकारे मूलभूत सुविधा पुरविल्या जातील.
अधिवेशन काळात 55 संघ संस्थांनी आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुरेपूर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला शहरात परवानगी देण्यात आलेले नाही असेही पोलीस आयुक्त मार्टिन यांनी यावेळी स्पष्ट केले.