बेळगाव : येथील 118 वर्षाची परंपरा असलेल्या दि. पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या 15 डिसेंबर रोजी होत आहे.
एकंदर 13 जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यामध्ये सामान्य गटातून सात उमेदवार, महिला गटातून दोन, कमी उत्पन्नाचे (ओबीसी) गटातून ए एक व बी एक असे दोन उमेदवार तसेच एस सी एक आणि एस टी एक असे एकंदर तेरा उमेदवार निवडले जाणार आहेत.
पायोनियर बँकेत सुमारे 6000 सभासद असले तरीही केवळ 988 सभासद निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्यास पात्र आहेत. पायोनियर बँकेची निवडणूक प्रक्रिया गेल्या 30 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर पर्यंत होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत विद्यमान संचालकासह एकंदर 33 सभासदांनी आपले 44 अर्ज दाखल केले आहेत.
2020 साली निवडणूक न होता श्री. प्रदीप अष्टेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडून आले होते मात्र यावेळी निवडणूक होणार हे निश्चित आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये सर्व विद्यमान संचालक असून अनेक नवीन चेहरे उभे आहेत. सामान्य गटातील सात जागांसाठी 19 उमेदवार महिला गटातील दोन जागांसाठी सहा उमेदवार, ओबीसी ए गटात एक उमेदवार, बी गटात एक उमेदवार उभे राहिले असून एसटी गटातून दोघेजण उभे आहेत. त्यामध्ये पिता पुत्रांचा समावेश आहे. रविवारी अर्जांची छाननी होणार असून सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून श्री. भरतेश शेबनावर हे काम पाहत आहेत