बेळगाव : पंचमसाली समाजाच्या आंदोलनात आज पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला आहे. लाठीचार्जच्या फोटोंसह बॅनर लावल्याने पोलिसांनी तो जप्त केला. यामुळे पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पंचमसाली समाजाच्या आंदोलनात आज डॉ. बी. आर. आंबेडकर उद्यानात पुन्हा एकदा हायड्रामा पाहायला मिळाला. सुवर्ण सौध परिसरात झालेल्या लाठीचार्जचे फोटो असलेले बॅनर आंदोलनकर्त्यांनी आज उद्यानात लावले होते. या बॅनरवर “चन्नम्माच्या भूमीत चन्नम्माच्या मुलांचे रक्त वाहिले” असे लिहिलेले होते. हे बॅनर पाहताच मार्केट पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि बॅनर त्वरित जप्त केले. यावेळी पंचमसाली आंदोलनकर्ते आणि पोलिस यांच्यात वादावादी झाली. पोलिसांच्या कारवाईवर आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.पंचमसाली स्वामीजींनी डॉ. आंबेडकर उद्यानात धरणे आंदोलन सुरू ठेवले होते. मात्र, पोलिसांनी अचानक बॅनर जप्त केल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये असंतोष उफाळला. पोलिस आणि सरकारवर पुन्हा एकदा आक्रोश व्यक्त करत पंचमसाली समाजाने सरकारवर अन्याय केल्याचा आरोप केला.यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या तणावाने वातावरण अधिक गंभीर झाले. पंचमसाली समाजाच्या मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.