बेळगाव : येथील जीएसएस कॉलेजच्या भूगर्भशास्त्राच्या विद्यार्थ्यांची स्टडी टूर गेली असता याचवेळी मुर्डेश्वर येथील समुद्रात कोलार येथील मोरारजी देसाई शाळेतील विद्यार्थी बुडताना बघून जीएसएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी साहस करत समुद्रात धाव घेतली आणि बुडत असलेल्या तीन मुलींना वाचविण्यात त्यांना यश मिळाले आहे. या बद्दल मिळालेली माहीती अशी की, जीएसएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक वर्ग 10 डिसेंबर रोजी उडुपी, गोकर्ण आणि मुर्डेश्वर येथे स्टडी टूरला गेले असता कॉलेजच्या विद्यार्थ्यांपैकी कु. विनायक बडकर, कु. श्रवण पाटील आणि प्रथमेश पाटील आणि इतर विद्यार्थ्यांनी मिळून आपल्या जिवाची पर्वा न करता बुडत असलेल्या विद्यार्थिनींना वाचविण्यासाठी धावून गेले आणि यापैकी 3 जणींना वाचविण्यात त्यांना यश मिळाले. याची दाखल घेत एस. के. इ. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या सर्व विद्यार्थ्यांना शाबासकी देत पाठ थोपटून त्यांचा गौरव केला. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. किरण ठाकूर, व्हा. चेअरमन श्री. एस. वाय. प्रभू, श्री. अशोक शानभाग आणि सेक्रेटरी श्री. मधुकर सामंत आणि श्रीमती लता कित्तूर, ज्ञानेश कलघटगी त्याच बरोबर कॉलेजचे प्राचार्य अरविंद हलगेकर, भूगर्भशास्त्राचे प्रमुख प्रा. सुरज मेणसे आणि इतर उपस्थित होते.