बेळगाव : उद्या 22 डिसेंबर 2024 रोजी मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. सर्वत्र सत्ताधारी पॅनलला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. काल शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सत्ताधारी पॅनलने चव्हाट गल्ली परिसरात प्रचार फेरी काढली. यावेळी गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक, पंचमंडळी, महिला वर्ग, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हलगीचा वाद्य आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात प्रचार फेरी पार पडली. गल्लीच्या वतीने जालगार मारुती मंदिर येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गल्लीतील मंडळींच्या वतीने सत्ताधारी पॅनलला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
यावेळी मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीतील उमेदवार बँकेचे माजी संचालक सुनील अष्टेकर, मोतेश बारदेशकर, शरद पाटील, विजय जाधव यांनी निवडणुकीतून माघार घेत सत्ताधारी पॅनलला आपला जाहीर पाठिंबा जाहीर केला.
यावेळी बोलताना बँकेचे संचालक सुनील अष्टेकर म्हणाले की, मी मागील दहा वर्षे मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेत संचालक म्हणून कार्यरत आहे. या कार्यकाळात बँकेचे सभासद, कर्मचारी वर्ग तसेच संचालक मंडळाने मला सहकार्य केले. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. यापुढे पॅनलमध्ये नवीन चेहऱ्याला संधी मिळावी आणि मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणून मी या निवडणुकीतून माघार घेत आहे. बँकेच्या सर्व सभासद मतदारांनी सत्ताधारी पॅनलला आपले बहुमोल मत देऊन भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन यावेळी सुनील अष्टेकर यांनी केले.