बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगावतर्फे सोमवार दिनांक १६ डिसेंबर २०२४ ते शनिवार दिनांक २१ डिसेंबर २०२४ या कालावधीत काव्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुलांचे लेखन कौशल्य सुधारावे, मराठी काव्य प्रकारांची ओळख व्हावी, मुलांना मराठी साहित्याविषयी आवड निर्माण व्हावी, त्याचबरोबर बेळगाव शहरातील मराठी विषय शिक्षकांच्या विचार अभिव्यक्ति कौशल्याला वाव मिळावा यासाठी या काव्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कवी हर्षदा सुंठणकर, कवी बी.जी.पाटील, गजानन सावंत, स्नेहल पोटे, प्रसाद सावंत यांनी आठवडाभर विद्यार्थांसाठी काव्य लेखन, वाचनाची सत्रे घेतली. या काव्य सप्ताहाचा सांगता समारंभ शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी संपन्न झाला. सांगता समारंभाला व्यासपीठावर प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री. जयंत नार्वेकर, सचिव श्री. सुभाष ओऊळकर, ज्येष्ठ समाजसेवक श्री. शिवाजीदादा कागणीकर व बेळगाव परिसरातील प्रसिध्द चार्टर्ड अकाऊंटंट श्री. आर. एन. हरगुडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत श्री. सुभाष ओऊळकर तर प्रास्ताविक श्री. जयंत नार्वेकर यांनी केले. यानंतर मराठी विषय शिक्षकांनी आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. यामध्ये कमल हलगेकर, माधुरी पाटील, बी. जी. पाटील, नीला आपटे, सहदेव कांबळे व प्रसाद सावंत यांनी सहभाग घेतला. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन सौ. शिल्पा गर्डे यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रतिभा मसुरकर यांनी केले. यावेळी प्रबोधिनीचे सदस्य चंद्रकांत पाटील, सुरेश गडकरी, विजय बोंगाळे, अशोक जांभळे, अनंत जांगळे, प्रा.सुरेश पाटील, प्रतापसिंह चव्हाण, इंद्रजित मोरे, नारायण उडकेकर, धीरज सिंह राजपूत, बी.बी. शिंदे, ज्योती मजूकर व मराठी भाषा प्रेमी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.