बेळगाव अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण निमित्त अंनिसतर्फे विशेष व्याख्यान
बेळगाव : हिंदू मुस्लिम, दिन दलित, दुबळे, कामगार, खासकरून महिलांसाठी राष्ट्रीय ऐक्य हा काँग्रेसचा कार्यक्रम होता. काँग्रेस चळवळीचा कार्यकर्ता जर व्हायचा असेल तर दोन हजार मीटर सूत कताई करून ते काँग्रेस कमिटीकडे सोपवायचं. पूर्वी काँग्रेस हा राजकीय पक्ष नव्हता तर एक चळवळ होती. बेळगावच्या अधिवेशनामध्ये अध्यक्षपदावरून गांधी यांनी कुठेही मनुस्मृती शब्दाचा उल्लेख न करता ती नाकारली होती. मनुस्मृतीला नाकारण्यासाठी स्त्रियांना शिक्षण देणे, दलितांना अधिकार देणे या कार्यक्रमातून त्यांनी उत्तर दिले. त्यासाठी मला नवा भारत निर्माण करायचा आहे असं गांधीनी बेळगावच्या अधिवेशनामध्ये अध्यक्षपदावरून जाहीर केलं होतं. प्रतिगामी लोकांना ज्यावेळी कळलं की हा माणूस धोकादायक आहे, तेव्हा या लोकांनी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. बेळगावच्या अधिवेशनामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले. गांधी म्हणजे स्वच्छता अभियान, सत्य, अहिंसा अशा चौकटीत बंदिस्त केले आहे. गांधी हे कामगार नेते तसेच अहमदाबाद येथे गीरणी कामगार संघटना स्थापन केली होती, असे प्रतिपादन प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या बेळगाव शाखेतर्फे ‘जागर विवेकाचा’ या उपक्रमांतर्गत शहीद भगतसिंग सभागृहात आयोजित विशेष व्याख्यानात ‘१९२४ च्या बेळगावमधील काँग्रेस अधिवेशनाचे महत्त्व’ या विषयावर प्राचार्य आनंद मेणसे यांनी सोळावे पुष्प गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते कॉ. नागेश सातेरी होते. त्यांनीही १९२४ च्या अधिवेशनाविषयी आठवणी सांगितल्या.
यावेळी कम्रेड अनिल आजगावकर, अर्जुन सांगावकर, कीर्ती कुमार दोशी, महेश राऊत, शेतकरी नेत्या शिवलीला मिसाळे, रामनाथ कानविंदे, एस. आर. पाटील, डॉ. शोभा नाईक, ऍड. सतीश बांदिवडेकर, मधू पाटील, संदीप मुतगेकर, मयूर नागेनट्टी, पूनम आदी सह सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक जोतिबा आगसीमनी यांनी केले व आभार सागर मरगाणाचे यांनी मानले.