बेळगाव : राहुल गांधींवर ड्रग्स एडिक्ट असल्याचा आरोप करणाऱ्यांना विरोधकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी कठोर टीका एआयसीसीचे राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
बेळगाव भारताच्या इतिहासातील एक अविस्मरणीय स्थान आहे. स्वातंत्र्य संग्रामासाठी महात्मा गांधींनी याच ठिकाणावरून रणशिंग फुंकले होते, असे विधान एआयसीसीचे राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी केले. आज त्यांनी बेळगाव मधील सांबरा विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना, बेळगाव हे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा संगम आहे, असे म्हटले. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला दिशा देणारे काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन याच ठिकाणी पार पडले होते. जात-धर्माच्या भेदांना नष्ट करून संपूर्ण देशाला एकत्र आणण्यासाठी गांधीजींनी याच ठिकाणावरून सत्याग्रहाची प्रेरणा दिली होती.आता 100 वर्षांनंतर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पुन्हा एकदा समाजाला एकत्र आणण्यासाठी महत्त्वपूर्ण अधिवेशनाचे आयोजन करत आहे. एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन होणार आहे. काँग्रेस संविधानाच्या सन्मानासाठी कटीबद्ध असून, दुसरीकडे भाजपा संविधानाचा अपमान करत असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला. राहुल गांधींना ड्रग्स एडिक्ट म्हणणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. असे लोक फक्त जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्यांकडून राहुल गांधींवर टीका होणे आश्चर्यकारक नाही, असे सुरजेवाला म्हणाले. महात्मा गांधींच्या हत्येमागेही अशाच विचारसरणीच्या शक्ती होत्या. त्यांच्या हयातीतही त्यांना विरोध झाला होता. मात्र, गांधींनी कधीही हार मानली नाही, त्याचप्रमाणे राहुल गांधीही हार मानणार नाहीत, असे ते म्हणाले. भाजपा नेत्यांनी महिला नेत्याचा अवमान करताना अश्लील भाषा वापरली आहे. भाजपा नेहमीच महिलांचा, तरुणांचा, दलितांचा आणि मागासवर्गीयांचा विरोध करणारे धोरण ठेवत आहे. अशा नेत्यांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.