बेळगाव : अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी “जय महाराष्ट्र”ची घोषणा देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच बेळगाव महानगरपालिका बरखास्त करावी या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
गुरुवारी शहरातील चन्नम्मा सर्कलमधून करवे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी बेळगाव महापालिकेवर मोर्चा काढून महापालिका बरखास्त करण्याची मागणी करत निदर्शने केली.
यावेळी बोलताना करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी म्हणाले की, कर्नाटकात कन्नडिग हे सार्वभौम आहेत, गेल्या रविवारी अनगोळ येथे झालेल्या मूर्ती अनावरण कार्यक्रमात “जय महाराष्ट्र” ची घोषणा देऊन राज्य विरोधी कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, अद्यापपर्यंत आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, या प्रकरणी सरकारने तात्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी. त्याशिवाय बेळगाव महापालिकेची प्रशासकीय समिती तातडीने बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी सुरेश गव्हाणवर, गणेश रोखडे, राजू नाशिपुडी, दशरथ बनोशी, बाळू जदगी, कृष्णा खानप्पाण्णावर, बसवराज आवरोली, महेश हट्टीहोळी, आरोग्यप्पा पदनकट्टी, सुधीर पाटील,
सतीश गुडावर, उदय चिक्कन्नवर, विठ्ठल कडाकोल, रुद्रगौडा पाटील, सुरेश मराघोडा, होलेप्पा सुलधाळ, बसवराज दुलाप्पागोळ, रमेश येरागन्ना आदींसह उपस्थित होते.