
बेळगाव : शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेत एका तरुणाने तरुणीवर अत्याचार करून तिची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेचे खासगी व्हिडिओ चित्रित केले असून त्याद्वारे तो ब्लॅकमेल केलेल्या तरूणाला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे.
शहापूरमधील रहिवासी ईश्वरसिंग प्रेमसिंग बडपुजे याने २०१९ मध्ये इन्स्टाग्रामवरून एका तरुणीशी मैत्री केली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात करून त्याने लग्नाचे आश्वासन दिले. यादरम्यान त्याने तरुणीला विश्वासात घेऊन तिच्यावर अत्याचार केले आणि तिचे अश्लील व्हिडिओ व फोटो मोबाईलमध्ये कैद केले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तरुणीकडे वारंवार पैशांसाठी तगादा लावला. आरोपीने तरुणीच्या वडिलांच्या मालमत्तेचे ८ लाख रुपये आणि एफडीमधील रक्कम मिळून सुमारे ७ लाख रुपये रोख तसेच १५० ग्रॅम सोन्याची लूट केली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा छळ उघडकीस आल्यानंतर पीडितेने पुराव्यासह शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न करता तक्रार मागे करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.
ईश्वरसिंग याने तरुणीची फसवणूक केली असून आता त्याचे कुटुंबीय लग्नासाठी ३ कोटी रुपयांची मागणी करत आहेत. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी सध्या दुसऱ्या एका तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असून त्याला तातडीने बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री करून तरुणीला १९ लाखांचा गंडा घालणाऱ्या ईश्वरसिंगवर कठोर कारवाई करावी आणि पीडितेचे पैसे परत मिळवून द्यावेत, अशी मागणी वकील मंदाकिनी अप्पुगोळ यांनी केली आहे. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना तरुणींनी सतर्क राहणे आवश्यक आहे. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta