बेळगाव : अरण्य खात्याच्या संचारी सीआयडी पथकाने कित्तुर येथे धाड टाकून एका व्यक्तीकडून सांबरचे कातडे जप्त केले. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव मधुकर गोपाळराव देशपांडे (५३) रा. गद्दी गल्ली, कित्तुर असे आहे. ही कारवाई अरण्य खात्याच्या सीआयडी संचारी पथकाच्या प्रमुख पीएसआय रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मधुकर देशपांडे हे बाँड रायटर असून त्यांनी वनखात्याची कोणतीही परवानगी न घेता सांबरचे कातडे आपल्या घरात तांदळाच्या पिशवीत लपवून ठेवले होते. देशपांडे यांच्याकडून सांबरचे कातडे, आठ किलो तांदूळ आणि कातडे ठेवण्यासाठी वापरलेली प्लास्टिक पिशवी जप्त करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये बेकायदा सांबरचे कातडे बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. के. बी. कंठी, एस.आर. अरिबेंची, एल.एस. नायक, यू.आर.पट्टेद, एम. ए. नायक आणि आर.बी. कोरिकोप्पा यांनी या कारवाईत भाग घेतला.