बेळगाव : राज्यात खुनाच्या घटना वाढत असल्याने पीएफआय, सीआयएफ आणि एसडीपीआय या समाजकंटक संघटनांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात आज आंदोलन केले.
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नेट्टारू यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ आज शनिवारी बेळगावच्या कोल्हापूर सर्कल परिसरात अभाविप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कर्नाटकातील लोक किती असुरक्षित जीवन जगत आहेत याचे उदाहरण आहे. राज्यात हिंदू संघटना आणि विचारधारेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची हत्या अत्यंत निषेधार्ह आहे, असा संताप त्यांनी घोषणाबाजी करत व्यक्त केला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अभाविप पदाधिकारी रोहित उमानाबादीमठ म्हणाले की, राज्यात अशा प्रकारच्या खुनाच्या घटना सातत्याने घडत असल्याने लोक गृहखात्याला प्रश्न विचारत आहेत. काही महिन्यांपूर्वीच शिमोगा येथे बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याची हत्या झाली. त्या पाठोपाठ आता प्रवीण नेट्टारूचा खून झाला, याचे कारण राज्याच्या गृहखात्याचे अपयश आहे. खून करणाऱ्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याबरोबरच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने कारवाई करावी. राज्यात एका विशिष्ट विचारसरणीच्या बाजूने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हत्येमागे पीएफआय, सीआयएफ आणि एसडीपीआयचा हात असून सरकारने त्यांच्यावर राज्यात बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने सुरू केली आहेत. बेळगावातही अभाविपने तीव्र आंदोलन केले आहे. या आंदोलनात किरण दुकानदार, शैलजा पाटील, किशोरी न्यामगौडा, अर्चना, संदीप तेलगार, दिपक कंबार यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta