बेळगाव : ग्राम पंचायत येळ्ळूर हद्दीत येणाऱ्या लक्ष्मी तलावाच्या बांधावर असलेल्या झाडांच्या फांद्यामूळे येळ्ळूरच्या मुख्य रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या वाहनांवर झाडांच्या फांद्या पडून नुकसान होतआहे. तसेच जीवित हानी आणि पुढेही नुकसान होण्याची शक्यता आहे. या झाडांच्या फांद्यांमुळे आणि बांबूच्या बेटाची पाने पाण्यामध्ये पडून पाणी दूषितही होत आहे. तसेच बांबू बेटामुळे त्या भागात सरपटणारे प्राणी भरपूर प्रमाणात आहेत. यामुळे तलावा शेजारी असलेल्या गणपत गल्ली मध्ये सरपटणारे प्राणी घुसत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या बेटांच्या आडोशाला बसून दिवस रात्र व्यसन करणाऱ्यांचा सुध्दा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी झाडांच्या फांद्या आणि बांबूची बेटे काढण्यासाठी ग्राम पंचायतीकडून कोणतीही अडचण नाही. ही झाडे आणि बेटे काढण्यासंदर्भात येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने वनविभागाला निवेदन देण्यात आले. यासंबंधी याआधीही असा अर्ज वन विभागाकडे दिला होता तरी याची दखल अजून घेतलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर याची दखल घ्यावी, अशी विनंती ग्रामपंचायतीच्या वतीने केली आहे. वन विभागाचे डीएफओ अँथोनी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्राम पंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील, रमेश मेनसे, शिवाजी नांदूरकर, परशराम परीट, जोतिबा चौगुले, सदस्या अनुसया परीट, रूपा पुण्यानावर, सुवर्णा बिजगरकर, शालन पाटील, वनिता परीट, मनीषा घाडी, उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta