बेळगाव : जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सीमालढा अखंडपणे चालूच राहील. हा स्वाभिमान आम्हाला कोणी शिकवलेला नाही. हा स्वाभिमान, ऊर्जा आमच्यात नैसर्गिकपणे आलेली आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता टिकविण्यासाठी आमच्या हक्काच्या भूमीत जाण्यासाठी हा लढा आम्ही असाच चालू ठेवू, असा इशारा मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांनी दिला आहे.
भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर 17 जानेवारी 1956 साली बेळगांव कारवारसह संपूर्ण सीमाभाग कर्नाटकात डांबण्यात आला. त्यावेळी जनक्षोभ उसळला व संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात हौतात्म्य प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज 17 जानेवारी रोजी हुतात्मा चौक येथे अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, रमाकांत कोंडूस्कर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, शिवानी पाटील, माजी नगरसेवक रणजित चव्हाण-पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, चंद्रकांत कोंडुस्कर, विकास कलघटगी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, सचिन गोरले, महेश जुवेकर, बाबू कोले आदींनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
प्रारंभी प्रास्ताविकात माजी महापौर मालोजीराव अष्टेकर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची मुद्देसूद तपशीलवार माहिती देताना म्हणाले की, अभिमानाची गोष्ट म्हणजे बेळगावात 1946 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मंजूर करण्यात आला होता. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी तो ठराव मांडला होता. बेळगावसह समस्त सीमाभागासहित मुंबई प्रांताचा जो मराठी भाषिक भाग होता त्याचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा ही इच्छा त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती. साहित्य संमेलन झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्र एकीकरण समितीची बेळगावात स्थापना झाली आणि त्या माध्यमातून बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात सामील करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तत्कालीन बेळगाव नगरपालिकेत 24 ऑगस्ट 1948 रोजी समस्त मराठी माणसांचा महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचा ठराव करण्यात आला होता, ही देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कर्नाटकातील लोक बेळगावहा कर्नाटकचा विभाज्य भाग होता असे म्हणतात. तेंव्हा कर्नाटकचे राज्यकर्ते अथवा कोणालाही माझा एक प्रश्न आहे, ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी कर्नाटक राज्य कोठे होते? ते त्यांनी नकाशावर दाखवावे. कारण कर्नाटक तेंव्हा अस्तित्वातच नव्हता. कर्नाटकचे चार जिल्हे मुंबई प्रांतात होते, तीन जिल्हे हैदराबाद संस्थानात होते, त्यांचे काही जिल्हे मद्रास प्रांतात होते मग कर्नाटक होते तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित करून खरे तर स्वातंत्र्यानंतर कर्नाटक नव्हे तर म्हैसूर राज्याची निर्मिती झाली होती. त्यानंतर 1973 साली आत्ताचा कर्नाटक निर्माण झाल्याचे अष्टेकर यांनी स्पष्ट केले. पूर्वी धारवाड, बेळगाव, विजापूर आणि कारवार हे जिल्हे मुंबई प्रांतात होते. हे आत्ताच्या कर्नाटकातील नेते व इतरांनी लक्षात घेतले पाहिजे असे सांगून मालोजीराव अष्टेकर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मदन बामणे यांनी केले. श्रद्धांजली वाहल्यानंतर रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुकर गल्ली, किर्लोस्कर रोड येथून श्रध्दांजलीपर फेरी काढण्यात आली. यावेळी “हुतात्मे अमर राहे”अश्या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता.