बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे 23 जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. हा दिवस ‘शारीरिक शिक्षण दिन’ म्हणून शाळेने उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शाळेचे शिक्षक श्री. दत्ता पाटील सर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रमुख पाहुणे श्री. दत्ता पाटील सर बोलताना म्हणाले की, 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘शारीरिक शिक्षण दिन’ म्हणून साजरी केली जाते. याला कारण असे की, सुभाषबाबुंनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून भारताला मुक्त करण्यासाठी नियमबद्ध सैन्य उभारले. ही सैन्यरचना म्हणजेच आझाद हिंद फौज होय. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुंगा।” असे म्हणत देशातील तरुण शक्ती एकत्र करून भारताच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले. सूत्रबद्ध सैन्यरचनेमुळे सुभाष चंद्र बोस जयंती ‘शारीरिक शिक्षण दिन’ म्हणून साजरी केली जाते.
या दिनाचे औचित्य साधून शाळेच्या क्रीडा विभागाने डंबेल्स कवायत, रिंग कवायत आणि नियमित कवायत प्रकार सादर केले. याद्वारे क्रिडाविभागाने शाळेमध्ये चैतन्यमय वातावरण निर्मिती केली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे क्रीडा शिक्षक श्री. दत्ता पाटील सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. जी. व्ही. सावंत सर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. एन. सी. उडकेकर सर, क्रीडा शिक्षक महेश हगिदळे सर, क्रीडा शिक्षिका पूजा संताजी, इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक श्री. श्रीधर बेन्नाळकर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta