बेळगाव : नावगे (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा आज रविवारी सकाळी मोठ्या दिमाखात पार पडला.
नावगे (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेला यंदा 2023 साली 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त गोव्याचे उद्योजक मारुती मोटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवारी सकाळी शाळेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. सदर सोहळ्याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी सन्माननीय अतिथी म. ए. समितीचे युवानेते आर. एम. चौगुले माजी महापौर शिवाजी सुंठकर, समिती नेते आर आय पाटील, बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, माजी महापौर शिवाजी सुंठकर, उद्योजक धनाजी गोल्याळकर, रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावचे माजी अध्यक्ष डी. बी. पाटील, ॲड. श्याम पाटील, ग्रा. पं. अध्यक्षा अर्चना चिगरे, उपाध्यक्ष भरमाण्णा पाटील, दीपक नलवडे, आपुनी पाटील, परशराम शहापूरकर व शिल्पा कामती हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेसह शिवमुर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलनाने अमृत महोत्सवी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
सोहळ्याच्या उद्घाटनानंतर माजी आमदार किणेकर यांच्यासह व्यासपीठावरील अन्य मान्यवरांनी समयोचीत विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी व्याख्याते परभणी मुंबईचे निलेश सावंत यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. प्रारंभी स्वागताध्यक्ष उद्योजक सुरेश हुंबरवाडी यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविकात बसाप्पा गवळी यांनी शाळेबद्दल माहिती दिली. नावगे सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या या अमृत महोत्सवी सोहळ्यास शाळेच्या शिक्षक वर्गासह निमंत्रित आणि आजी-माजी विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta