Saturday , September 21 2024
Breaking News

समितीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार

Spread the love

बिजगर्णी, बेळवट्टी विभाग समिती कार्यकर्त्यांचा मेळावा

बेळगाव : कन्नडसक्तीच्या वरवंट्याखाली आज मराठी भाषा आणि संस्कृती धोक्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच विजयी करून मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण करण्याचा निर्धार बिजगर्णी व बेळवट्टी ग्रामपंचायत क्षेत्रातील आठ गावातील समिती कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला. गोडसे काजू फॅक्टरीच्या आवारात झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण गोडसे होते.
दशरथ सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक करून मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर बोलताना बी. बी. देसाई म्हणाले, कर्नाटकातील बहु भाषिक मराठी भाग महाराष्ट्राचा आहे हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक लढवून ती जिंकण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला. त्यानंतर ग्रामपंचायती पासून ते विधानसभेपर्यंत सर्व निवडणुका जिंकून मराठी भाषिकांचे या भागावर वर्चस्व सिद्ध केले. परंतु कन्नड धार्जिन्या कर्नाटक सरकारने या भागावरील मराठी भाषिकांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न चालविले आहेत. यासाठी मराठी भाषिकांनी आता एकजूट दाखवून समितीचा उमेदवार विजयी केला पाहिजे.
फोडा नि झोडा नीती अवलंबून मराठी भाषिकात फूट पाडण्याचा त्यांनी पद्धतशीर प्रयत्न चालविला आहे. विकासाच्या नावाखाली मराठी भाषिकांना वश करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटक सरकारचे डावपेच ओळखून मराठी भाषिकानी सावध होण्याची आज गरज असल्याचे सांगून समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे व समितीच्याच उमेदवारांना विजयी करण्याचे त्यांनी मराठी भाषिक कार्यकर्त्यांना आवाहन केले.
समितीचे नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर म्हणाले, समितीचा विजय ही काळाची गरज आहे. यासाठी मराठी भाषिकांनी संघटित राहून समितीच्या उमेदवारालाच विजयी केले पाहिजे. समिती जो उमेदवार देईल त्याच्याच पाठिशी मराठी जनतेने खंबीरपणे राहीले पाहिजे. समितीचा विजय म्हणजे मराठी माणसाचा विजय याची जाणीव ठेऊन सर्वानी एकजूटीचे प्रदर्शन घडवावे, असे त्यांनी आवाहन केले.
समितीचे ज्येष्ठ नेते आर. आय. पाटील म्हणाले, सुरुवातीच्या काळात मराठी भाषिकांनी एकजूट दाखवून सातत्याने समिती उमेदवाराचाच विजय केला आणि हा भाग महाराष्ट्राचा हे सिद्ध केले. हीच जिद्द सर्व मराठी भाषिकांनी पुन्हा दाखवून दिली पाहिजे. उमेदवार कोण हे महत्त्वाचे नाही समितीचा विजय महत्त्वाचा आहे. समितीपासून दुरावलेल्या मराठी भाषिकांनी आत्मचिंतन करून पुन्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
युवा नेते आर. एम. चौगुले, बी. एस. पाटील, एन. के. नलावडे, परशराम पाटील, कॅप्टन दामोदर मोरे, गावडू हजगुळकर, रामचंद्र मोदगेकर, भागोजी पाटील, आप्पा जाधव, सुरेश राजूकर यांनीही आपले विचार व्यक्त करून समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
दशरथ सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले, महेश जाधव यांनी आभार मानले.
मेळाव्याला ऍड. सुधीर चव्हाण, बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्ष म्हाळु मजूकर, दामू मोरे, बिजगर्णी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष वसंत अष्टेकर, संजय अष्टेकर, श्रीरंग भाष्कळ, संदीप अष्टेकर, संजय जाधव, अशोक गावडा, विलास कांबळे, गोविंद कांबळे, भुजंग गाडेकर, सातेरी चौगुले, मनोहर होसुरकर, ओमाणी भोगण, गुंडू बडसकर, ज्ञानेश्वर चौगुले, खाचू गायकवाड, नामदेव शिवनगेकर, अजित देसाई, कल्लाप्पा पाटील, रामू पाटील, विठ्ठल पाटील, बळवंत पाटील, नारायण कांबळे, कृष्णा कांबळे, मारुती कडोलकर, रवळू मोरे, यशवंत मोरे, नारायण मोरे, अशोक मजुकर, नाना मजुकर, विठ्ठल गोडसे, विठ्ठल मजुकर, यल्लुप्पा बेळगावकर, संजय सावंत याच्यासह बिजगर्णी, कावळेवाडी, येळेबैल राकसकोप, बेळवट्टी, इनाम बडस, बाकनूर, धामणे (एस) आदी गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वसंत अष्टेकर यांचा सत्कार
मेळाव्याचे औचित्य साधून बीजगर्णी ग्रामस्थ मंडळाच्या अध्यक्षपदी समितीचे कार्यकर्ते वसंत अष्टेकर यांची एकमताने निवड झाल्याबद्दल बी. बी. देसाई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. विविध संघ व संस्थांतर्फही त्यांचे अभिनंदन करण्यात आले. वसंत अष्टेकर यांनी आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून एकीकरण समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

About Belgaum Varta

Check Also

ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रमाची आवश्यकता : वाय. पी. नाईक

Spread the love  बिजगर्णी…(बेळगाव) : विद्यार्थी दशेत आपल्याला कोण व्हायचे आहे ते निश्चित करणं गरजेचं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *