
बेळगाव : दक्षिण विधानसभा मतदार संघाचे समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज थाटात करण्यात आले. बॅ. नाथ पै सर्कल ते खासबाग डबल रोड या मार्गावरील माजी आमदार कै. संभाजीराव पाटील यांच्या इमारतीत या कार्यालयाचे उद्घाटन विविध समिती नेते, पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दीपक दळवी, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, बी. ओ. येतोजी, रणजीत चव्हाण पाटील, दक्षिण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना दीपक दळवी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या नवऊर्जेचे कौतुक केले. आगामी काळात हीच ऊर्जा मतदानाच्या स्वरूपात दाखवून समिती उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तब्येत ठीक नसूनही दीपक दळवी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
यावेळी मालोजीराव अष्टेकर, महादेव पाटील, समाजसेवक ज्ञानेश सराफ यांच्यासह अनेक मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी ज्ञानेश सराफ यांनी समितीसाठी देणगीस्वरुपात रोख रक्कम देऊन राष्ट्रीय पक्षांना चोख प्रत्त्युत्तर दिले. आपण राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांकडून पैसे घेऊन आपली मते विकत नाही तर स्वाभिमानाने आपल्या संघटनेसाठी देणगी देऊन संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय विद्यमान लोकप्रतिनिधींना प्रत्त्युत्तर देण्यासाठी रमाकांत कोंडुसकर यांची उमेदवार म्हणून केलेली निवड योग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास बी. ओ. येतोजी, दीपक दळवी, मालोजीराव अष्टेकर, रणजित चव्हाण पाटील, सुधा भातकांडे, सतीश पाटील, अप्पासाहेब गुरव, नेताजी जाधव, माजी उपमहापौर मधुश्री पुजारी, शिवानी पाटील, आदींसह समिती पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवराज पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta