बेळगाव : बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची सूचना करून सरकारकडून आवश्यक सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राजू सेठ यांनी जोमाने कामाला सुरवात केली असून मंगळवारी त्यांनी मुत्यानटटी येथे पाणी पुरवठा योजनेला चालना दिली होती. त्यानंतर आज त्यांनी शहरातील बीम्स इस्पितळाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली.
जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी रुग्णांना पुरवल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा तपासला. बीम्सचे संचालक डॉक्टर अशोक शेट्टी, डॉक्टर ए. बी. पाटील व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून इस्पितळाच्या सध्यस्थितीची माहिती घेतली. यावेळी बीम्स इस्पितळात डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफची कमतरता असल्याचे आमदार सेठ यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार राजू सेठ म्हणाले की, बीम्स इस्पितळाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आज येथे भेट दिली आहे. आयसीयू, डायलीसिस आदी विभागांची पाहणी केली. भोजन पुरवठा विभागात जेवणाचा दर्जा तपासला. येथे डॉक्टर्स आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
तरीही येथील डॉक्टर्स आणि नर्सिंग कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलही तयार झाले आहे. आवश्यक उपकरणे आणि साहित्य सरकारकडून मिळवून देण्यासाठी तसेच आवश्यक डॉक्टर्स, कर्मचारी भरतीसाठीही आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta