बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कडोली, देवगिरी, जाफरवाडी, केदनूर व मन्नीकेरी येथील शेतीसाठी नियमित वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ व हसीरु सेनेतर्फे करण्यात आली.
शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने सदर निवेदनाचा स्वीकार करत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आले.
बेळगाव परिसरामध्ये दरवर्षी हजारो एकर जमिनीतून भात पिकासह विविध पिके घेतली जातात. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे पिकांना पंपद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पण शेतकऱ्यांना पुरविले जाणारे वीज सातत्याने खंडित होत असल्यामुळे पिकांना पुरेसे पाणीपुरवठा होत नाही त्यामुळे पीक वाढीला धोका निर्माण झालेला आहे. बेळगाव परिसरातील गावांमध्ये नियमित वीज पुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पीकाला पाणी देणे अशक्य होत आहे. तेव्हा शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागात नियमित वीजपुरवठा करण्याची सूचना हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना केली जावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई, सुभाष धायगोंडे, चंद्रु राजाई, मारुती कडेमनी, धुंडाप्पा पाटील यांच्यासह रयत संघ व हसीरु सेनेचे सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta