बेळगाव अंनिसतर्फे जागर विवेकाचा उपक्रमांतर्गत विशेष व्याख्यान
बेळगाव : आधी समाज तयार होऊन त्याच्या व्यवस्थेच्या आणि नियमांच्या नोंदी मनूने दोन हजार वर्षांपूर्वी मनुस्मृती ग्रंथात नोंदवल्या आहेत. म्हणून हा कायद्याचा ग्रंथ असून यात एकूण बारा अध्याय आणि तब्बल दोन हजार सहाशे चौऱ्यांशी श्लोक आहेत. ब्रम्हदेवाने भृगुला हे नियम सांगितले. भृगुने सांगितलेल्या नोंदी मनूने लिहून ठेवल्या. चार वर्णांची निर्मिती, त्यांची कर्तव्ये आणि आचरणात आणाव्यात अशा नियमांचे वर्णन यात आहे. जन्माबद्दल चर्चा, नामकरण करण्याची पद्धत, उपनयन करण्याचा अधिकार, गुरू-शिष्यविषयी विश्लेषण, वर्णानुसार कामे अशा अनेक प्रकारच्या विषयांचे विवेचन करणारे श्लोक मनुस्मृतीत असल्याचे प्रतिपादन प्रा. आनंद मेणसे यांनी केले.
येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेळगाव शाखेतर्फे जागर विवेकाचा या उपक्रमांतर्गत आयोजित ‘समजून घेऊया मनुस्मृती’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. मेणसे बोलत होते. अर्जुन चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या व्याख्यानात सभांचावर बेळगाव अंनिसचे कार्याध्यक्ष शंकर चौगुले आणि ऍड नागेश सातेरी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण कापुन अभिवादन करण्यात आले. प्रारंभी शंकर चौगुले यांनी क्रांतिगीत सादर केले.
आनंद मेणसे पुढे म्हणाले, मनुस्मृतींचा पहिल्यांदा अभ्यास १७९४ मध्ये ब्रिटीशांनी केला. विल्यम जोन्स याने या ग्रंथाचे भाषांतर इंग्रजीत केले. मनुस्मृतीमध्ये वर्णांवर आधारित जी कामाची विभागणी केलेली आहे तीत ब्राम्हणांनी धर्माचे पूजेचे काम करावे. क्षत्रियांनी संरक्षण आणि शेती करावी, वैस्यांनी व्यापार करावा तर शूद्रांनी सर्वांच्या सेवेचे आणि स्वच्छतेचे काम करावे असे नियम सांगितले आहेत. मनुस्मृती मध्ये सर्वात जास्त अन्याय हा स्त्रियांवर केला असून ज्या घरी अधिक मुली आहेत किंवा तिला भाऊ नसेल तर अशा मुलींशी विवाह करू नये, तिने पुरुषावर अवलंबून राहावे, कोणतीही गोष्ट स्वयं निर्णयाने करू नये अशी अनेक बंधने महिलांवर लादली आहेत. असे ते म्हणाले.
यावेळी अरुण बाळेकुंद्री, मनोहर हुक्केरीकर, एस. आर. पाटील, अजय सातेरी, अमोल जाधव, अनिल आजगावकर, भरत गावडे, मधू पाटील, सागर मरगाणाचे, संदीप मुतगेकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि श्रोते उपस्थित होते. आभार जोतिबा अगसीमनी यांनी मानले.