बेळगाव : बेळगाव परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथे असलेल्या प्राचीन आणि बेळगाव परिसरातील एकमेव श्री काळभैरव मंदिराचा उल्लेख करावा लागतो. संस्थानिक काळापासून अस्तित्वात असलेल्या या प्राचीन श्री काळभैरव मंदिराचा जीर्णोद्धार आणि कळसा रोहन सोहळा आज गुरुवारी सकाळी मोठ्या भक्तीभावात प्रारंभ झाला आहे.
बेळगाव परिसरातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री ज्योतिर्लिंगाच्या पूजेचा अग्रमान श्री काळभैरवाला दिला जातो. त्यामुळे बेळगाव परिसरात एकमेव प्राचीन असलेल्या शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथील श्री काळभैरव मंदिराचे महत्त्व मोठे आहे. या प्राचीन श्री काळभैरव मंदिराची उभारणी माणिकनाथ महाराज (वडगाव) यांनी 1899 साली केल्याचे सांगितले जाते. मंदिर उभारणीसाठी तात्कालिन सांगली संस्थांकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली होती.
या मंदिरातील श्री काळभैरवांची चार फूट उंच काळ्यापाषाणातील मूर्ती तेजस्वी मुद्रेची आहे. या मूर्तीला चार हात असून, हातात डमरू, त्रिशूळ, कप्पर, पद्मम आहेत.श्री काळभैरवांचे वाहन श्वान ही आहे. अशी तेजस्वी मूर्ती पंचक्रोशीत पाहायला मिळत नाही बेळगाव तील एक जागृत आणि नवसाला पावणारे देवस्थान म्हणून शहापूरच्या श्री काळभैरव देवस्थानाची ख्याती आहे.
माणिकनाथ महाराज यांच्या पश्चात, त्यांचे बंधू पारसनाथ महाराज व त्यांच्या नंतर रामचंद्रनाथ महाराज यांच्या श्री काळभैरव मंदिर सेवेची परंपरा गुरुनाथ रामचंद्रराव महाराज राऊळ यांनी चालविली आहे. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक विधी सोहळा संपन्न होत असतात. नवरात्रीत प्रत्येक दिवशी विशेष पूजा आयोजित केली जाते. कार्तिक पौर्णिमेला श्री काळभैरव जयंती साजरी केली जाते. प्रत्येक रविवार आणि अमावस्येला मंदिरात श्री मूर्तीला पंचामृत, तैलाभिषेकासह आणि विशेष पूजा केली जाते.
तब्बल सव्वाशे वर्ष होऊनही अधिक काळ पुरातन असलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम 2015 साली हाती घेण्यात आले.भव्य मंदिर उभारण्यासाठी आत्तापर्यंत 45 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. नवा गाभारा, होम कुंड, कळस, दोन सभागृह, रंगरंगोटी, फरशी, मुख्यद्वाराची नवी चौकट आदी कामे पार पडली आहेत.
दरम्यान आज गुरुवारी विविध मठांच्या गुरूंच्या सानिध्यात सकाळी सहा वाजल्यापासून होम हवन, भस्मलेपन, अभिषेक, मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना, महापूजा अधिक कार्यक्रम सुरू झाले आहेत.