बेळगाव : बेळगाव- पंढरपूर रेल्वे सुरू करा, अशा मागणीचे निवेदन बेळगावच्या वारकरी मंडळातर्फे आज मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
बेळगाव जिल्ह्यातून पंढरपूरला मोठ्या संख्येने भाविक वर्षभर प्रवास करत असतात. बेळगावहून पंढरपूरला जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास सोयीचा ठरतो. यापुर्वी बेळगावहून सुरू असलेल्या बेळगाव-पंढरपूर रेल्वे सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. बेळगाव-पंढरपूर रेल्वे, बेळगावहून दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनी सुटत होती. सदर गाडी बेळगाव सह आसपासच्या जिल्ह्यातील वारकरी व भाविकांना अत्यंत सोयीची होती. दरम्यान, ही रेल्वे बंद केल्याने बेळगाव जिल्ह्यासह चंदगड तालुका व धारवाड जिल्ह्यातील भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे. बेळगाव जिल्हा तसेच चंदगड व धारवाड जिल्ह्यातील भाविकांची गैरसोय ओळखून बेळगाव- पंढरपूर दुपारची रेल्वे सेवा नव्याने सुरू करण्यात यावी. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या मागणी संदर्भात रेल्वे विभागाला माहिती देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना सांगितले आहे. यावेळी वारकरी मंडळाचे अध्यक्ष बाळू शंकर केरवाडकर, अजित पाटील, राजशेखर गणाचारी, उमेश दुसरे, यल्लाप्पा शहापूरकर, रवींद्र पाटील, लक्ष्मी काकतीकर, मारुती सांबरेकर, फकिरा कुंडेकर, युवराज मादाकाचे यांच्यासह अन्य वारकरी मंडळी उपस्थित होती.