
बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना, बेळगावच्या नूतन अध्यक्षपदी सुधीर हनुमंतराव बिर्जे यांची तर सेक्रेटरीपदी ज्योतिबा कृष्णा हुंदरे यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत उपरोक्त निवड करण्यात आली सदर बैठकीत नूतन कार्यकारणीच्या निवडीबाबत चर्चा झाली. सदर चर्चेअंती उपस्थित सभासदांनी एकमताने सुधीर हनुमंतराव बिर्जे यांची अध्यक्षपदी, त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी शिवाजी पाटील, सेक्रेटरीपदी ज्योतिबा कृष्णा हुंदरे आणि खजिनदारपदी ए. जी. मंतुर्गी यांची निवड केली. बैठकीस मावळते अध्यक्ष विश्वनाथ पाटील, अप्पय्या अप्पन्नावर, चेतन बुद्दन्नवर, बाहुबली पाटील, अभिजीत पाटील, सुहास पाटील आदीसह बहुसंख्य सभासद उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचा अल्पपरिचय खालील प्रमाणे आहे.
अध्यक्ष सुधीर हनुमंतराव बिर्जे : सुधीर यांनी संघटनेमध्ये सेक्रेटरी म्हणून उत्तमरीत्या कार्य केले आहे. एकेकाळी स्वतः मातब्बर पैलवान असलेल्या सुधीर यांनी शाळा व महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली असून ते युनिव्हर्सिटी ब्लू देखील आहेत. ‘कर्नाटक केसरी’ विनायक दावणगिरी याला चितपट करून त्यांनी आपल्या नावाचा डंका वाजविला होता. बीकॉम, एमबीए शिक्षणानंतर मॅक्लेओडस या खाजगी कंपनीत ते गेल्या 18 वर्षापासून कार्यरत आहेत. कंपनीतर्फे त्यांनी 8 वेळा विदेश दौरा केला आहे. त्यांचे वडील जुन्या काळातील नामवंत पैलवान हनुमंतराव नारायण बिर्जे हे संघटनेचे संस्थापक उपाध्यक्ष आहेत.
उपाध्यक्ष शिवाजी पाटील : शिवाजी हे होलसेल भाजी मार्केट येथे स्वतःचा व्यवसाय सांभाळतात. कुस्तीच्या उत्कर्षासाठी ते सातत्याने झटत असतात.
सेक्रेटरी ज्योतिबा कृष्णा हुंदरे : मच्छे येथील एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील असलेल्या ज्योतिबा यांनी खडतर परिस्थितीला तोंड देत मातब्बर पैलवान म्हणून नांव कमावले आहे. खेडोपाडी त्यांनी अनेक आकर्षक कुस्त्या केल्या असून स्वबळावर ‘सह्याद्री डेकोर’ ही संस्था उत्कर्षास आणली आहे. आपल्या व्यवसायाच्या मोठ्या पसाऱ्यामध्येही त्यांनी लाल मातीशी असलेले आपले नाते तोडलेले नाही. कुस्तीवर नितांत प्रेम असलेले ज्योतिबा हुंदरे हे सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात.
Belgaum Varta Belgaum Varta