बेळगाव : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारा राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून आज बेळगाव महापौर व उपमहापौरांच्या हस्ते येथे विधिवत गंगा पूजन करण्यात आले.
बेळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच पश्चिम घाटात, पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नद्या प्रवाहित होऊन पाण्याची पातळी वाढल्याने राकसकोप जलाशय तुडुंब भरला आहे. या पार्श्वभूमीवर आज परंपरेनुसार बेळगावच्या महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते जलाशयावर गंगापूजन करण्यात आले. उत्तम पीक, पाण्यासाठी महापौर सविता कांबळे यांनी प्रार्थना केली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून यंदा बेळगावकरांना पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे. बेळगाव शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी लोकांकडून आल्यानंतर लक्ष्मी टाकेडी येथील पंप हाऊसला भेट देऊन तपासणी करण्यात आली. हा प्रश्न लवकरच सोडवला जाईल. तोवर खबरदारीचा उपाय म्हणून बेळगावकरांना पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महापौर सविता कांबळे यांनी केले.
यावेळी माजी उपमहापौर रेश्मा पाटील, माजी महापौर शोभा सोमनाचे, नगरसवेक गिरीश धोंगडी, वीणा विजापुरे, सारिका पाटील, श्रेयस नाकडी, जयतीर्थ सौंदत्ती आदींसह पाणी पुरवठा मंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.