बेळगाव : मुडा घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या चारित्र्याचे हणन करण्याचे षडयंत्र विरोधकांनी रचले असून राज्यपालांनी कोणाच्याही दबावाला बळी पडू नये, या मागणीसाठी बेळगावात भाजप आणि जेडीएसच्या विरोधात शोषित समाजाच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली.
अहिंद नेते, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या शोषित समाजाच्या वतीने आज बेळगावात जोरदार आंदोलन करण्यात आले. राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रतिमेला अभिषेक करून नोटीस देणाऱ्या राज्यपालांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. राजकीय कारकिर्दीत एकही काळा डाग नसलेल्या सिध्दरामय्यांनी काहीही चुकीचे केले नसल्याचे सांगत घोषणाबाजी केली.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्र सरकारला देण्यात आले.
यावेळी बोलताना काँग्रेस उत्तरचे आमदार आसिफ सेठ म्हणाले की, सिद्धरामय्या यांच्या ४५ वर्षांच्या राजकारणात एकही काळा डाग नाही. मात्र, भाजप आणि जेडीएसने त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा कट रचला आहे. राज्यपालांनी लोकशाहीच्या आज्ञेत राहून काम केले पाहिजे. या घोटाळ्याच्या आरोपांवर आम्ही कायदेशीर कारवाई करू. राज्यपालांनी आपली जबाबदारी विसरल्यास राज्यातील सर्व जिल्ह्यातील मागासवर्गीयांना राजभवनाला घेराव घालावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे बोलताना म्हणाले, सिद्धरामय्या हे सर्व समाजाच्या कल्याणासाठी सुशासन देत आहेत. मात्र, केंद्रातील आघाडी सरकार सिद्धरामय्या यांच्या राजकीय चारित्र्य बिघडविण्याचा प्रयत्न करत आहे. शोषित समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असून राज्यपाल कार्यालयाचे भाजप कार्यालयात रूपांतर करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. राज्यपालांनी कोणत्याही दबावापुढे झुकू नये, असेहि ते म्हणाले.
सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात असून, राज्यपालांनी घटनात्मक आणि कायदेशीरदृष्ट्या निर्णय घ्यावा. भाजप आणि जेडीएस नेत्यांच्या दबावाला बळी पडू नये. राज्यपालांनी आपली जबाबदारी विसरल्यास शोषित वर्गातून राज्यात रक्तक्रांती होईल, असा इशारा नेते राजेंद्र सन्नक्की यांनी दिला. या रॅलीत शोषित, मागासवर्गीयांचे नेते, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.