बेळगाव : दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची संगत केल्याने मनुष्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याला इतिहासही अपवाद नाही त्यामुळे वैष्णवानी अभक्त आणि कुसंगांचा संग करू नये” असे आवाहन इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी आपल्या कथानकात केले.
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीकृष्ण कथा महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी श्रीमद् भागवतातील 57 व्या अध्यायातील दहाव्या स्कंधा चे विवरण केले. “भगवान श्रीकृष्णांचा महाभारतातील उल्लेख हा त्यांच्या विसाव्या वर्षी येतो” असं सांगून महाराज म्हणाले की, “खरे पाहता पांडू राजांच्या निधनानंतर सिंहासनावर युधिस्टीर महाराज आरुढ व्हायला हवे होते. पण त्यांचे वय लहान असल्याने धृतराष्ट्र हे राजा झाले. पांडवांचे वाढत चाललेले बळ हे दुर्योधनला मान्य नव्हते. म्हणून त्यांनी पांडवाना त्यांच्या आई समवेत वारणाव्रतला पाठवून द्यायची योजना आखली. पुत्र स्नेहाने आंधळ्या झालेल्या अंध धृतराष्ट्राला ती कल्पना आवडली. दरम्यान दुर्योधनाने पुरोचन या वास्तुकाराला बोलावून ‘वारणाव्रत येथे एक असा महल बांधावा की त्याला आग लावली तर तो पूर्ण जळून नष्ट होईल’ अशी आज्ञा दिली. त्याप्रमाणे पूरोचनाने तसा महल बांधला आणि तेथे पांडव आपली माता कुंती समवेत राहू लागले. मात्र ही गोष्ट विधूराना माहित होती म्हणून त्यांनी सुरुंग खोदणाऱ्या एका व्यक्तीला बोलवून त्याद्वारे वारणावर्ताच्या त्या महालातून जंगलात पोहोचणारा एक सुरुंग खोदला. पांडव तेथे अनेक दिवस राहिले. एका दिवशी पुरोचन व त्याचे मित्र यांनी तेथे येऊन जल्लोष केला आणि मध्यधुंद अवस्थेत असताना महलाला आग लागली. सुरुंगाच्या वाटेतून पांडव निसटले. मात्र पूरोचन व त्याचे मित्र जळून खाक झाले. सर्वांना पांडवच जळून गेले असे वाटले आणि तशीच अफवा पसरली गेली. पण प्रत्यक्षात पांडव महालातून बाहेर पडून जंगलात सुरक्षित ठिकाणी पोहोचले होते.
त्यानंतर काही दिवसांनी द्रुपद महाराजांची कन्या द्रौपदी हिच्या स्वयंवराची घोषणा पांडवाना समजली. सर्व पांडव ब्राह्मणांच्या वेशात तिथे गेले. पांडव तिथे येणार असल्याची माहिती श्रीकृष्णांना होती म्हणून श्रीकृष्ण बलराम समवेत तेथे गेले. श्रीकृष्णांचा महाभारतातील सर्वप्रथम उल्लेख हा येथे आढळतो.
दृपद महाराजांनी आयोजिलेला यज्ञ जिंकून अर्जुनाने द्रौपदी बरोबर विवाह केला.
दरम्यान सत्रजित राजाने भगवंतांना दोषी ठरवले होते याची माहिती भगवंतांचे पार्षद असलेल्या अक्रूर व कृतकर्माला होती. त्या दोघांनी सत्रजित महाराजांच्या विरोधात शतधनवाला भडकावले शतधनवाने सत्रजितांची हत्या केली. ही गोष्ट कळताच सत्रजितांची कन्या सत्यभामा हिने भगवंतासमोर आक्रोश केला तेव्हाभगवंतानी शतधनवाची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शतधनवा जेथे पळून गेला होता त्या मिथिलीला भगवंत पोहोचले त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने शतधनवाची मान कापली. दरम्यान भगवंत द्वारकेत आले तेथे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या म्हणून त्यांनी अक्रूराला निमंत्रण दिले अक्रूर सम्यंतक मनीसह तेथे आला आणि त्याने तो मणी भगवंतांच्याकडे अर्पण केला.
सुमारें दीड तासाच्या कथानकाने महाराजानी सर्वांना मंत्र मुग्ध केले.