Friday , October 18 2024
Breaking News

म. गांधी विचार गौरव पुरस्काराने कॉ. कृष्णा मेणसे सन्मानीत

Spread the love

 

दिमाखदार सोहळ्यात खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

बेळगाव : गांधी विचार व कम्युनिस्ट विचार हे दोन टोकाचे विचारप्रवाह आहेत. असे असताना कॉ. कृष्णा मेणसे यांना महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. ही माझ्या दृष्टीने वेगळी घटना आहे, असे उद्‌गार कॉ. संपत देसाई यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना काढले. कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज अध्यक्षस्थानी होते.

गडहिंग्लज येथील महात्मा गांधी विचारमंचच्यावतीने देण्यात येणारा पहिला महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत कॉ. कृष्णा मेणसे यांना गांधी जयंतीचे औचित्य साधून समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साधना शिक्षण संस्था गडहिंग्लजचे संस्थापक जे. बी. बारदेस्कर व प्रमुख वक्ते म्हणून कॉ. संपत देसाई उपस्थित होते. व्यासपीठावर त्यांच्यासह दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील, मराठी विद्यानिकेतनचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, प्राध्यापक सुभाष कोरे, प्रा. सुनील शिंत्रे आदी उपस्थित होते.

निला आपटे यांनी सादर केलेल्या ‘वैष्णव जन तो तेरे कहिये’ या महात्मा गांधींच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर मराठी विद्यानिकेतनच्या संगीत विभागाने ‘भारतात बंधूभाव नित्य वसू दे’ हे स्वागतगीत सादर केले.

विचार मंचचे प्रा. सुनील शिंत्रे यांनी स्वागत करताना कॉ. कृष्णा मेणसे यांना पुरस्कार देण्यामागची भूमिका विषद केली. यानंतर खासदार शाहू महाराज यांचे संस्थेच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. यानंतर प्राचार्य कल्याणराव पुजारी यांनी प्रास्ताविकात महात्मा गांधी विचारमंचच्या कार्याची माहिती दिल्यानंतर प्रा. सुभाष कोरे यांनी कॉ. कृष्णा मेणसे यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले. त्यानंतर खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते कॉ. कृष्णा मेणसे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. घोंगडे, मानपत्र, ११ हजार रूपये रोख व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रमुख वक्ते कॉ. संपत देसाई म्हणाले, आज भारतात सांस्कृतिक क्षेत्राचा ऱ्हास होत आहे. देश एका कडेलोटावर उभा आहे. अशावेळी कॉ. कृष्णा मेणसे यांना देण्यात आलेल्या गांधी विचार पुरस्काराचे महत्व मोठे आहे. महात्मा गांधी यांनी अहिंसेचे तत्व जागतिक पातळीवर नेले. त्यांच्या विचारानेच आजच्या काळातसुद्धा जगासमोरील समस्यांची सोडवणूक करता येते. इतके ते विचार महत्वपूर्ण आहेत. कॉ. कृष्णा मेणसे यांनी स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, गोवामुक्ती आंदोलन, सीमालढा याबरोबरच कष्टकऱ्यांच्या विविध आंदोलनात सक्रिय भाग घेतला. त्याचा कॉ. देसाई यांनी आपल्या भाषणात कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला व मेणसे यांच्यासारख्या त्यागी कार्यकर्त्याला हा पुरस्कार दिल्याबद्दल विचार मंचचे अभिनंदन केले.

कॉ. कृष्णा मेणसे यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, १९४६ साली मॅट्रिकच्या परिक्षेसाठी फॉर्म भरण्याकरिता घरातून पैसे देण्यात आले होते. पण परीक्षा देऊन आपणाला इंग्रजांची नोकरी करायची नाही. म्हणून आपण परिक्षेला न बसता महात्मा गांधींच्या आश्रमात दाखल झालो. मात्र महात्मा गांधींनी मला पुढील शिक्षण घेऊन पुन्हा आंदोलनात येण्याचा सल्ला दिला. माझ्या राजकीय जीवनाची सुरूवात महात्मा गांधींच्या चळवळीतील सहभागाने झाली. आपल्या प्रार्थनेच्यावेळी त्यांनी तरूण कार्यकर्ते स्वातंत्र्य लढ्यात येत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य आता दूर नाही असे सांगितले आणि १९४७ साली आपणाला स्वातंत्र्य मिळाले याची आठवण कॉ. मेणसे यांनी सांगितली. सीमालढ्याचे नेतृत्वही मी केले. पण अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. खासदार शाहू महाराज यांनी लक्ष घालून सीमावासियांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा पूर्ण करावी अशी विनंती केली. यावेळी ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संपूर्ण महाराष्ट्र झाला पहिजे’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले.

अध्यक्षीय भाषणात खासदार शाहू महाराज यांनी महात्मा गांधींचा विचारच जगाला तारू शकेल, असे सांगितले. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा गौतम बुद्धांचा संदेश होता. २५०० वर्षांनंतरसुद्धा समाजात तेच प्रश्न आहेत. म्हणूनच गांधीजींनी हा संदेश आपल्या कार्याद्वारे पुढे नेला.

सीमाप्रश्नाचा उल्लेख करून शाहू महाराज म्हणाले, गेली वीस वर्षे सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयांने निकाल दिला तर तो सीमावासियांच्या बाजूनेच असेल याची मला खात्री आहे. कारण सीमावासियांची बाजू न्याय्य आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्न फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. कोल्हापूरची जनता सीमावासीयांच्या पाठिशी कायम राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यानंतर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, सह्याद्री को-ऑप. सोसायटी व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यावतीने खासदार शाहू महाराज व कॉ. मेणसे यांचा सत्कार करण्यात आला. मालवण येथील शिवपुतळा कोसळला. या घटनेच्या कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी असा ठराव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी मांडला. त्याला उपस्थितांनी अनुमोदन दिले.

सुभाष ओऊळकर यांच्या आभार प्रदर्शनाने समारंभाची सांगता झाली. ज्योती कॉलेजमध्ये झालेल्या या समारंभास बेळगावसह गडहिंग्लज व कोल्हापूर येथील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. प्रा. अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

गणेश दूध केंद्राचा उद्या वर्धापन दिन

Spread the love  बेळगाव : उचगाव क्रॉस येथील गणेश दूध संकलन केंद्राचा १० वा वर्धापन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *