बेळगाव : पाणी टंचाईची समस्या उद्भवल्याने देसूर (ता. जि. बेळगाव) गावच्या मदतीला उद्योजक गोविंद टक्केकर धाऊन गेले असून त्यांनी गावात टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठ्याचे स्तुत्य कार्य सुरू केले आहे. पावसाळ्याचे दिवस अद्याप समाप्त झालेले नसताना बेळगाव तालुक्यातील देसूर गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
यंदा बेळगाव तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून सध्या परतीचा पाऊस देखील जोमात आहे. त्यामुळे नदी-नाले जलाशयांमध्ये पाण्याचा उत्तम साठा झालेला असताना देखील देसूरवासीयाना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. ही बाब कानावर येताच उद्योजक गोविंद टक्केकर देसूरवासीयांच्या मदतीला धावले आहेत. त्यांनी स्वखर्चातून गावातील नागरिकांसाठी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गावकऱ्यात समाधान व्यक्त होत असून ते उद्योजक गोविंद टक्केकर यांना दुवा देत आहेत.