बेळगांव : रविवार दि. 27-10-24 रोजी सायंकाळी लोकमान्य ग्रंथालयात क्लटर टू क्लॅरिटी या इंग्रजी पुस्तकाचा शानदार प्रकाशन समारंभ झाला.अध्यक्षस्थानी लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष श्री.जगदीश कु़ंटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बुक लव्हर्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य श्री.उदय लवाटे होते. व्यासपिठावर लेखिकेसह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. अनंत लाड उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तर सुश्री गिरीजा हलगेकर व श्रीया भातकांडेनी सुंदर ईशस्तवन आणि प्रार्थना सादर केली. त्यानंतर उदय लवाटे, जगदीश कुंटे,ज्योती कुकडोळकर-भरमुचे, मनोहर कुकडोळकर व ईश्वर लगाडे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
मुळच्या बेळगावच्या पण सध्या बेंगळुरूमध्ये असलेल्या लेखिका सौ.ज्योतीनी अंजना रीतोरिया यांच्या व्हिडिओतून लेखनाची प्रेरणा कशी घेतली व या पुस्तकाचे लेखन आपण कसे केले याची सुंदर माहिती दिली. दैनंदिन जीवनात आपण घरात कसा नको असलेल्या वस्तुंचा पसारा कसा करतो व मग तो कसा आवरायचा या विषयी या पुस्तकात आपण मार्गदर्शन केले असुन लहान वयातच ही सवय लावली मुलांच्या जीवनात पुढे चांगल्या सवयी लागून भरपूर वेळ वाचतो असे त्या म्हणाल्या.
प्रमुख पाहुणे उदय लवाटेनी पुस्तकाचे व लेखिकेचे कौतुक करीत मोबाईलमध्ये सुद्धा कितीतरी नको असलेल्या गोष्टी असतात व त्या आवराव्या लागतात असे मत मांडले.
अध्यक्षीय समारोपात जगदीश कुंटेनी निटनेटकेपणा आवश्यक असल्याचे अधोरेखित करीत लेखिकेला भरपूर शुभेच्छा दिल्या. रमेश कुकडोळकर यांनी आभार मानले तर अनंत लाड यांनी सुत्रसंचलन केले. चहापानापूर्वी लेखिकेने श्रोत्यांसाठी छोटासा क्वीझचा खेळ घेत बरोबर उत्तर देणाऱ्यांना बक्षीसे देत कौतुक केले.कार्यक्रमासाठी पुस्तक प्रेमी व कुकडोळकर-भरमुचे परिवाराची मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.