बेळगाव : लेखकाने समाजातील तळागाळा पर्यंत जाऊन दिन दलितांच्या समस्या मांडाव्यात. मानवांची दुःख व वेदना मांडाव्यात आणि मांडलेल्या समस्यांची उत्तरे ही लेखकाने द्यावी . जास्तीत जास्त लेखक जर घडतील तरच ते समाजाच्या दृष्टीने हितावह आहे. आपण सर्वांनी वाचन केले पाहिजे, समाजाला वाचण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यातून लिखाण घडले पाहिजे. आपण घडू व दुसऱ्यांना सुद्धा घडवू या उद्देशाने सर्वांनी कार्यरत राहायला हवे. तरच मराठी भाषा व साहित्य वृद्धिंगत होईल. साहित्य संस्कृतीमध्ये बदल घडवते, देश घडवते, देशातील परिवर्तन घडवते,
असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांनी केले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्यानिमित्त अखिल भारतीय साहित्य परिषद बेळगाव व संदेश न्यूज बेळगाव यांच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
संदेश न्यूजच्या “दीप संदेश” या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. व्यासपीठावर उद्घाटक अनिल आजगावकर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राजाध्यक्ष रवींद्र पाटील, अध्यक्ष सुधीर चव्हाण, शिवसंत संजय मोरे, डी. बी. पाटील, कवी निळूभाऊ नार्वेकर उपस्थित होते.
आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आपली मराठी भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, स्तंभ लेखनकार अनिल आजगावकर यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. जसा इंग्रजीचा वापर ज्ञानदानाच्या कार्यामध्ये होतो तसाच मराठी भाषेचा उपयोग व्हावा. मराठी भाषेमध्ये साहित्यिकांनी संशोधन करणे गरजेचे आहे. संशोधनासोबतच मराठी भाषेचा आर्थिक व्यवहारात तसेच चलनात आणि दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग झाला पाहिजे. शिवाजी महाराजांनी मराठी भाषा राज्यकारभारात वापरली. व तिचा एक भाषाकोश तयार केला. त्याचप्रमाणे सरकारकडून प्राथमिक पासून ते पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रम मराठी माध्यमातून झाला पाहिजे. आपल्या मुलांनी उत्स्फूर्तपणे मराठी विषय घेऊन त्यामध्ये प्रगती केली पाहिजे. तरच मिळालेल्या मराठी अभिजात भाषेचे सार्थक होईल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. सरकारचं काम मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं ते काम त्यांनी केलेले आहे. आता आपल्या लेखकांनी मराठी भाषेचा सखोल अभ्यास करून विविध रूपाने आपले विचार मांडले पाहिजेत. सर्व प्रकारचे साहित्य ललित, समाजकारण, राजकीय साहित्य, कविता, कथा, कादंबरी, चरित्र, लेखकांनी वृद्धिंगत केले पाहिजे. लेखकांनी वाचन केले पाहिजे तरच लेखक आपला शब्दसंग्रह वाढवू शकतो आणि तो चांगले लेखन करू शकतो. मराठी भाषा ही व्यवहाराची भाषा झाली पाहिजे. ती व्यवहारात व आचरणात आणली पाहिजे. बरेच मराठीचे पारिभाषिक शब्द आपण वापरात आणले पाहिजेत.
आपल्या बोली भाषेतूनच प्रमाणभाषा तयार झालेली आहे. त्यासाठी बोली भाषेचा अनादर न करता त्या बोली भाषांमध्ये सुद्धा विपुल लेखन केले पाहिजे. तरच साहित्यातून समाजाच्या व्यथा मांडल्या जातील. व उपेक्षितांची दुःखे सर्वांना कळतील.
मराठी भाषेचा आपण सर्वांनी जास्तीत जास्त वापर करूया. कारण भाषा ही प्रत्येक व्यक्तींच्या मनामनाचे संपर्काचे माध्यम आहे. त्यामुळे त्या माय मराठीला हृदयात साठवू या. माय मराठीला उत्तुंग शिखरावर पोहोचवूया, असे ते म्हणाले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील व अनिल आजगावकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
प्रारंभी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल माय मराठीच्या गौरवार्थ ज्येष्ठ कवी निळूभाऊ नार्वेकर, कवित्री अस्मिता आळतेकर, कवित्री स्मिता किल्लेकर यांनी कविता सादर केल्या.
यावेळी सामाजिक कार्याबद्दल डी. बी. पाटील, अनुजा मिठारे, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संजय गौंदाडकर यांचा सत्कार करण्यात आला.
संदेश न्यूज व दीपसंदेश दिवाळी अंकाच्या संपादिका अरुणा गोजे पाटील यांनी दिवाळी अंकाबाबतची माहिती दिली.
रोशनी हुंदरे आणि मनीषा नाडगौडा यांनी सूत्रसंचालन केले. लेखक रणजीत चौगुले यांनी आभार मानले. यावेळी कवी चंद्रशेखर गायकवाड, एम. के. पाटील, लेखक बजरंग धामणेकर, प्रियांका धामणेकर, प्रतिभा सडेकर, जयश्री दिवटे, नेत्रा मेनसे, पद्मा पाटील, सविता वेसने, डॉ.संजीवनी खंडागळे व अखिल भारतीय साहित्य परिषदेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.